सतत वाहतुकीची कोंडी : पोलीस प्रशासनाचीसुद्धा डोकेदुखी, वाहतुकीचे नियम सर्वांनीच पाळणे बंधनकारक
बेळगाव : शहरातील वाहनांची वाढती वर्दळ आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी ही केवळ नागरिकांचीच नव्हे तर पोलीस प्रशासनाचीसुद्धा डोकेदुखी झाली आहे. तिसऱ्या रेल्वेगेटनजीक उड्डाणपुलाची दुरुस्ती सुरू झाल्याने सध्या वाहतूक वळविण्यात आली आहे. त्यामुळे सकाळी शाळा सुरू होण्याच्या व कार्यालयीन वेळेत आणि संध्याकाळी प्रचंड गर्दी होत आहे. यातच भर पडत आहे ती एकेरी मार्गावरून सुरू असलेल्या वाहनचालकांची. वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत शहरात बरीच उदासीनता दिसते. गोवावेसवरून किंवा दुसऱ्या रेल्वेगेटवरून विरुद्ध दिशेने एकेरी वाहने हाकत लांबचा वळसा चुकविण्याचा प्रयत्न वाहनचालक करतात. त्याचप्रमाणे सर्वाधिक वाहने हाकली जाणारे एकेरी मार्ग म्हणजे किर्लोस्कर रोड व रामदेव गल्ली. या दोन्ही मार्गांवरून सर्रास विरुद्ध दिशेने वाहने येत असतात आणि नियमानुसार वाहन चालविणाऱ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागतो.
वाहतूक नियंत्रित करण्यासाठी धर्मवीर संभाजी चौक येथे वाहतूक पोलीस असतात. परंतु, याचाच फायदा वाहतुकीचे नियम मोडणारे वाहनचालक घेत आहेत. समादेवी गल्ली, खडेबाजार येथून रामदेव गल्लीत सर्रास एकेरी मार्गाने वाहतूक सुरू आहे. तसेच किर्लोस्कर रोडवरूनही विरुद्ध दिशेने वाहनचालक बिनधास्त वाहन चालवताना दिसत आहेत. या दोन्ही ठिकाणी पोलीस नसल्याने त्यांना कोण रोखणार, हा प्रश्न आहे. जर एखादी चारचाकी किंवा अवजड वाहन या मार्गावर थांबले असेल आणि नियमानुसार वाहनचालक जात असताना विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्यांमुळे या दोन्ही ठिकाणी सातत्याने कोंडी होत आहे. पोलीस नसल्याचा फायदा नियम मोडणारे घेत आहेत. परंतु, त्यामुळे या दोन्ही ठिकाणी सतत वाहतूक कोंडी होत आहे. मुख्य म्हणजे हे दोन्ही मार्ग शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने तसेच या ठिकाणी अनेक आस्थापने असल्याने येथे सतत गर्दी असते. परंतु, एकेरी वाहनधारकांवर नियंत्रण नसल्याने ही गर्दी वाढतच चालली आहे.
वाहतुकीवर नियंत्रण आणण्याचे आश्वासन
यासंदर्भात पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही बाब निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद देऊन आपण त्वरित एकेरी वाहतुकीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. वाहतुकीचे नियम सर्वांनीच पाळणे बंधनकारक आहे. मात्र, तसे होत नसल्यास आपण त्यामध्ये लक्ष घालू. नागरिकांनीसुद्धा याबाबतच्या तक्रारी आपल्याला कळवाव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.
edit by sstems









