कुकी समाजाची वस्ती असलेल्या भागात हिंसाचार
► वृत्तसंस्था/ इंफाळ
मणिपूरमध्ये पुन्हा एकदा दोन समुदायांमध्ये हिंसाचार झाल्याची बातमी समोर आली आहे. चुराचंदपूर आणि बिष्णुपूर जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या खोइरेंटक गावात कुकी समाजाची वस्ती असलेल्या भागात हल्लेखोरांनी गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल गावकऱ्यांकडूनही प्रतिहल्ला करण्यात आला. या संघर्षात गावातील दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली असून ते सुरक्षा स्वयंसेवक असल्याचे सांगण्यात आले. हल्ल्यात सहभागी असलेल्या एका संशयिताला अटक करण्यात आली आहे.
नरसेना क्षेत्राला लागून असलेल्या गावांमध्ये झालेल्या गोळीबारात दोन जण ठार झाले आणि सात जण जखमी झाल्याची माहिती मणिपूर पोलिसांनी दिली. परिसरात तैनात जिल्हा पोलीस, आसाम रायफल्स, लष्कर आणि केंद्रीय दलाने परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. 30 वषीय जंगमिनलून गंगटे असे मृतांपैकी एकाचे नाव आहे. मृत्यू झालेल्या दुसऱ्या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. सात जखमींना शासकीय ऊग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
खोइरेंटक गावात रात्री उशिरापर्यंत हा हिंसाचार सुरूच होता, असे वृत्त आहे. गोळीबार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर या भागात तैनात असलेल्या केंद्रीय सुरक्षा दलांनी आणि लष्कराने कारवाई सुरू केली. गेल्या 24 तासात बिष्णुपूर आणि थौबल जिह्यातून सात बंदुका, 25 विविध प्रकारचा दारूगोळा आणि कारवाईदरम्यान लुटलेले नऊ शक्तिशाली बॉम्बही जप्त करण्यात आले आहेत. खोऱ्यातील पाच जिल्ह्यांतील सीमा आणि संवेदनशील भागात सुरक्षा दलांकडून शोधमोहीम राबवण्यात आली.
चार दहशतवाद्यांना अटक
हिंसाचाराव्यतिरिक्त अन्य एका कारवाईत वेगवेगळ्या संघटनांच्या चार दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळाही जप्त करण्यात आला आहे. त्यांना इम्फाळ पूर्व आणि बिष्णुपूर जिह्यातून पकडण्यात आले आहे. पकडलेल्या चार दहशतवाद्यांपैकी एक एनएससीएन (आयएम), एक पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) आणि दोन कांगलीपाक कम्युनिस्ट पार्टीचे (केसीपी) सदस्य असल्याचे चौकशीअंती स्पष्ट झाले आहे.









