जिल्हा सीईएन पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी
बेळगाव : राजस्थान प्रिमियर लिग संघात खेळण्यासाठी संधी मिळवून देण्याचे सांगून चिंचणी, ता. चिकोडी येथील एका क्रिकेटपटूला 24 लाखांना ठकवण्यात आले होते. जिल्हा सीईएन पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला असून उत्तर प्रदेशमधील सुलतानपूरमध्ये दोघा जणांना अटक केली आहे. दिवाकर घन:श्याम वर्मा (वय 30), सुशांजल विनय श्रीवास्तव (वय 27) दोघेही राहणार लालू का पूर्व, तालुका लंबुआ, जि. सुलतानपूर, उत्तर प्रदेश अशी त्यांची नावे आहेत. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद, जिल्हा सीईएनचे पोलीस उपअधीक्षक वीरेश दोडमनी आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर व त्यांच्या सहकाऱ्यांनी या दोघा जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. राकेश भीमाप्पा येडुरे या क्रिकेटपटूची फसवणूक करण्यात आली आहे. 16 मे 2025 रोजी राकेशने दिलेल्या फिर्यादीवरून येथील जिल्हा सीईएन पोलीस स्थानकात यासंबंधी एफआयआर दाखल करण्यात आले होते. आपल्याला क्रिकेटची आवड आहे. आंतरराज्य पातळीवर खेळतो. राजस्थान प्रिमियर लिग या संघात निवड करण्यात येईल, असे सांगत या दोघा जणांनी टप्प्याटप्प्याने 23 लाख 53 हजार 550 रुपये आपल्या बँक खात्यात जमा करून घेतले होते.
प्रत्यक्षात 22 नोव्हेंबर 2024 ते 19 एप्रिल 2025 पर्यंतटप्प्याटप्प्याने या भामट्यांनी आपल्या बँक खात्यावर रक्कम जमा करून घेतली होती. मे 2024 मध्ये राकेश येडुरे हा तरुण क्रिकेट खेळण्यासाठी हैद्राबादला गेला होता. तेथे या तरुणाने उत्तम खेळाचे प्रदर्शन केले. क्रिकेट संघांसाठी खेळाडूंची निवड करणारे अनेक जण येथे आले होते. ‘सुशांत-श्रीवास्तव’ नावे इन्स्टाग्राम खाते असणाऱ्या भामट्याने राकेशशी संपर्क साधून निवड कमिटीचे सदस्य आहोत. राजस्थान प्रिमियर लिग संघात तुझी निवड करून प्रत्येक मॅचसाठी 40 हजार रुपये व प्लेअर फी म्हणून 8 लाख रुपये द्यायला लावण्याचे सांगून राकेशला विश्वासात घेतले होते. या दोन्ही भामट्यांवर विश्वास ठेवून त्याने टप्प्याटप्प्याने 23 लाख 53 हजार 550 रुपये भामट्यांच्या बँक खात्यावर जमा केले होते. राजस्थान प्रिमियर लिग क्रिकेट संघात निवड तर झाली नाही, दिलेले पैसेही परत करण्यास त्यांनी टाळाटाळ केली. आपण फसलो गेलो हे लक्षात येताच राकेशने जिल्हा सीईएन पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. पोलिसांनी या आंतरराज्य टोळीचा छडा लावला आहे.
प्रत्येकाने खबरदारी बाळगण्याचे आवाहन
जिल्हा सीईएनचे पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर व त्यांच्या सहकाऱ्यांनी उत्तर प्रदेशपर्यंत जाळे टाकून दिवाकर व सुशांजल या दोघा जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांना न्यायालयासमोर हजर करून पुढील चौकशीसाठी पोलीस कोठडीतही घेण्यात आले आहे. ऑनलाईनच्या माध्यमातून होणारी सर्वसामान्यांची फसवणूक टाळण्यासाठी प्रत्येकाने खबरदारी बाळगण्याचे आवाहन सुनीलकुमार यांनी केले आहे.









