मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याकडून घोषणा
वृत्तसंस्था/ जयपूर
राजस्थानात चालू वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याकडून अनेक योजनांची घोषणा केली जात आहे. याचदरम्यान गेहलोत याहंनी राइट टू हेल्थ म्हणजेच आरोग्याचा अधिकार लागू करणारे राजस्थान हे देशातील पहिले राज्य ठरल्याची घोषणा मंगळवारी केली आहे.
राइट टू हेल्थसंबंधी सरकार अणि डॉक्टरांदरम्यान अखेर सहमती झाल्याने मी आनंदी आहे. याचमुळे राजस्थान हे राइट टू हेल्थ लागू करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे. डॉक्टर अन् रुग्णांमधील नातं पूर्वीप्रमाणेच कायम राहणार अशी अपेक्षा असल्याचे गेहलोत यांनी म्हटले आहे.
आरोग्याचा अधिकार विधेयक अलिकडेच राजस्थान विधानसभेत संमत झाले आहे. आरोग्याचा अधिकार विधेयक राजस्थानच्या रहिवाशांना खासगी रुग्णालये, क्लीनिक्समध्ये देखील मोफत उपचाराचा अधिकार प्रदान करते. राजस्थानच्या प्रत्येक व्यक्तीला कुठल्याही पूर्व देयकाशिवाय आपत्कालीन वैद्यकीय सेवा मिळणार असल्याचे विधेयकात म्हटले गेले आहे.
या विधेयकाच्या विरोधात राजस्थानातील सर्वच डॉक्टरांनी संप पुकारला होता. या संपामुळे सर्वसामान्य लोकांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. या विधेयकातील तरतुदीला या डॉक्टरांनी विरोध दर्शविला आहे. राज्य सरकारने संबंधित बिलाची जबाबदारी उचलण्याची हमी दिल्यावर डॉक्टरांनी संप मागे घेण्याची तयारी दर्शविली होती.









