फलटण :
राष्ट्रीय महामार्गाचे सरकारी काम असल्याचे भासवून व खोट्या वर्क ऑर्डर दाखवून फसवणूक करून सुमारे 65 लाख रुपये किंमतीचे दोन ट्रॅक्टर व एक पोकलेन मशिन भाड्याने नेऊन त्याची परस्पर विक्री केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी फलटण पोलिसांनी कर्नाटक येथील दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन ट्रॅक्टर व एक पोकलेन मशीन ताब्यात घेण्यात आले आहे. फेसबुकवरून केलेल्या पोस्टनंतर हा प्रकार घडल्याचे उघड झाले आहे.
मोहम्मद मुस्ताक मोहम्मद हुसेन (वय 38, रा. काझी मोहल्ला, चित्रदुर्ग, कर्नाटक) व इदमा हबिब रेहमान कुंजी बिहारी (वय 64, रा. अद्दुर (मुडबिद्री) मंगलोर, कर्नाटक) अशी अटक केलेल्या संशयीत आरोपींची नावे आहेत.
याबाबत फलटण शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, विनय संपत माने (हल्ली मु. फलटण, मूळ रा. गोंदवले बुद्रुक, ता. माण) यांनी फेसबुकद्वारे ट्रॅक्टर भाड्याने दिले जातील, याबाबतची जाहिरात दिली होती. त्यावरून कर्नाटक राज्यातील संशयीत मुस्ताक मोहम्मद हुसेन याने विनय माने यांना आमच्याकडे राष्ट्रीय महामार्गाचे सरकारी काम असल्याचे भासवून, त्यांच्याकडून दोन ट्रॅक्टर व एक पोकलेन मशीन भाडेकरार करून कर्नाटक येथे नेले होते. त्यानंतर माने यांनी ठरल्याप्रमाणे भाडे घेण्यासाठी हुसेन याच्याशी संपर्क साधला असता त्यांचा फोन बंद येत होता. त्यानंतर आरोपीने दिलेला पत्ता व सरकारी कामाची वर्कऑर्डर खोटी असल्याचे माने यांच्या लक्षात आले. यावरून त्यांनी फलटण शहर पोलीस ठाणे येथे 5 ऑगस्ट रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. त्यावरून फलटण शहर पोलीस ठाण्यात संबंधित आरोपी विरुद्ध गुरनं. क्र.266/2025, भा.न्या.सं. चे कलम 318(4), 316(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या अनुषंगाने तपास करताना पोलिसांनी प्राप्त माहितीनुसार नायगाव (मुंबई) येथून संशयित आरोपी मुस्ताक मोहम्मद हुसेन यास ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता तो व त्याचा साथीदार इदमा हबीब रहेमान कुंजी बिहारी हे शेतकऱ्यांना सरकारी कामाच्या खोट्या वर्क ऑर्डर दाखवून त्यांच्याकडून ट्रॅक्टर, पोकलेन इत्यादी वस्तू घेऊन दुसऱ्या राज्यात विकत असल्याचे निदर्शनास आले. सदर वाहनांची खोटी कागदपत्रे करून ती अन्य राज्यात विकल्याचे सांगितले. पोलिसांनी दोघांना अटक करून त्यांच्याकडून तपास करून सुमारे 65 लाख रुपये किंमतीचे दोन ट्रॅक्टर व एक पोकलेन मशिन हस्तगत केले.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक तुषार जोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, पोलीस उपअधीक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा, पोलीस उपनिरीक्षक विजयमाला गाजरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष कदम, पोलीस अंमलदार पूनम बोबडे, काकासो कर्णे, अतुल बडे, जितेंद्र टिके यांनी केली आहे.








