तक्रारीनंतर पबमध्ये छापा मारून दोघांना अटक, कळंगुट पोलिसांची कारवाई
म्हापसा : अहमदनगर महाराष्ट्र येथून कळंगुट येथे आलेल्या दोन पर्यटकांना पबमध्ये डांबून ठेवून त्यांना मारहाण करुन त्यांच्याकडील मोबाईल व गुगल पे द्वारे 30 हजार रुपये जबरदस्तीने लुटण्याचा प्रकार नुकताच घडला. याप्रकरणी काल शुक्रवारी पोलिसांनी दोघा बिगरगोमंतकीय दलालांना अटक केली आहे. आठ दिवसांपूर्वीही अशीच एक घटना घडली होती. आता ही दुसरी घटना घडल्यानंतर गोव्याच्या पर्यटनाची बदनामी करणाऱ्या या प्रकाराची सरकार कितपत गंभीर दखल घेते, हे जनतेला कळणार आहे. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी या दोन्ही पर्यटकांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे. या प्रकरणी कळंगुट पोलिसांनी ज्या दोघांना अटक केली ते दोघेही बिगरगोमंतकीय असून त्यातील संतोष चव्हाण हा सोलापूर येथील असून पृथ्वी पटोळे हा सुद्धा मूळ सोलापूरचा असून सध्या कळंगुटमध्ये राहणारा आहे.
पर्यटकांनी कथन केला सारा प्रकार
पर्यटक महावीर गुगले व अशोक भालेराव यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते 24 ऑक्टोबरला गोव्यात आल्यानंतर कळंगूट येथील समुद्रकिनाऱ्यावर गेले होते. तेथे रात्री 10 वा. च्या सुमारास अटक केलेल्या या दोघांनी त्यांना पब दाखवतो, असे सांगून पबमध्ये नेऊन एका खोलीत डांबले. त्यांचे मोबाईल हिसकावून घेतले, असे सांगितले.
मोबाईल, पैसे लुटले अन् मारहाणही
आतमध्ये अशाच प्रकारे अन्य काहींना डांबून ठेवले होते. त्यांनाही या दलालांनी लुटले होते. या दोघांकडून तीस हजार रुपये लुटले, शिवाय त्यांना मारहाणही केली. पबमधून बाहेर आल्यावर त्यांनी पायी चालत म्हापसा कदंब बसस्थानक गाठले. तिथे समीर पेडणेकर व शैलेश गडेकर यांना याबाबत सांगितले. त्यानंतर पत्रकारांशी संपर्क साधून कळंगूट पोलिसांना कळविण्यात आले, असे या पर्यटकांनी सांगितले. पत्रकारांनी याबाबत कळंगुट पोलीस निरीक्षक परेश नाईक यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानंतर या दोन्ही पर्यटकांना पोलिसांनी कळंगुट येथे बोलावून घेतले. या दोघांनी दिलेल्या माहितीनुसार, पबवर छापा मारून संतोष चव्हाण व पृथ्वी पटोळे यांना अटक केली. तसेच लुटलेले 30 हजार रुपये त्या पर्यटकांना मिळवून दिले.









