कारागृहात जिवंत काडतूस प्रकरणाने खळबळ
कोल्हापूर : पुण्यातील आंदेकर टोळीतील दोघा कुख्यात गुंडाकडे कळंबा कारागृहात जिवंत काडतूस सापडले होते. या प्रकरणी सुरेश बळीराम दयाळू व अमीर उर्फ चंक्या असीर खान या दोघांना लवकरच जुना राजवाडा पोलीस अटक करणार आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतर ही अटकेची कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी, कळंबा कारागृहातील सर्कल क्रमांक सातजवळील स्वच्छतागृहात जिवंत काडतूस मिळाल्याने खळबळ उडाली होती. याप्रकरणी मोकातील संशयित सुरेश दयाळू आणि अमीर ऊर्फ चंक्या खान या दोघांवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी कारागृहातील इतर कैद्यांकडेही याबाबत चौकशी केली आहे. गुन्हा दाखल झालेल्या संशयितांना ताब्यात घेण्यासाठी न्यायालयाची परवानगी आवश्यक असल्याने पोलिसांकडून याबाबत पत्र व्यवहार करण्यात आला आहे. दोघांना लवकरच ताब्यात घेतले जाणार आहे. यानंतरच या काडतूस प्रकरणी नवीन माहिती समोर येण्याची शक्यता आहे.








