वृत्तसंस्था/ ब्रसेल्स
रशिया-युक्रेन युद्धाला 96 दिवस पूर्ण झाले आहेत. याचदरम्यान युरोपीय महासंघाने रशियाकडून कच्च्या तेलाची आयात दोन-तृतीयांश कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. युरोपीय महासंघाने रशियाकडून होणाऱया कच्च्या तेलाच्या आयातीच्या दोन-तृतीयांश हिस्स्यावर बंदी घालण्याचा एक करार केला आहे. या निर्णयामुळे रशियावर युद्ध संपुष्टात आणण्यासाठी दबाव वाढणार असल्याचे युरोपीय परिषदेचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल यांनी म्हटले आहे.
तर रशियाने नेदरलँडचा गॅस पुरवठा रोखण्याचा निर्णय घेतला आहे. नेदरलँडची सरकारचे समर्थनप्राप्त कंपनी गॅसटेराने रशियन कंपनी गॅजप्रोमला रुबलमध्ये पेमेंट करण्यास नकार दिला होता. याचमुळे रशियाने मंगळवारपासून गॅस पुरवठा रोखला आहे. नेदरलँडचे ऊर्जा क्षेत्र 44 टक्के गॅसवर अवलंबून आहे. परंतु हा देश रशियाकडून गरजेच्या तुलनेत 15 टक्के गॅसच आयात करत होता.
युक्रेनच्या पुनर्विकासासाठी युरोपीय महासंघाने 9 अब्ज युरो इतका निधी देण्याची तयारी दर्शविली आहे. तर रशियाच्या कब्जातील मेलिटोपोल शहरात कारबॉम्बचा स्फोट झाला असून यात तिघेजण जखमी झाले आहेत. रशियाच्या सैन्याने सुमीनजीक शोस्तका शहरात एका तासात 20 पेक्षा अधिक वेळा बॉम्बवर्षाव केला आहे.
युक्रेनचे अध्या वोल्दोमिर झेलेंस्की यांनी युरोपीय महासंघाला अंतर्गत मतभेद संपविण्याचे आवाहन केले आहे. युरोपीय महासंघाने रशियाच्या विरोधात आणखीन निर्बंध लादण्याची गरज आहे. ही वेळ वेगळे होण्याची नव्हे तर एकत्र येण्याची असल्याचे त्यांनी म्हटले आहे. युक्रेनला दीर्घ पल्ल्यापर्यंत मारा करणारी क्षेपणास्त्र यंत्रणा देणार नसल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी सांगितले आहे.
प्रेंच पत्रकाराचा मृत्यू युक्रेनच्या पूर्व लुहान्स्क भागात रशियाच्या हल्ल्यात एका प्रेंच पत्रकाराचा मृत्यू झाला आहे. प्रेडरिक लेक्लेर-इमहॉफ यांना या हल्ल्यात जीव गमवावा लागला आहे. रशियाच्या हल्ल्यापासून वाचविण्यासाठी एक बस लोकांना शहराबाहेर नेत होती. या बसवर झालेल्या हल्ल्यात 32 वर्षीय इमहॉफ यांचा मृत्यू झाला आहे. ते बीएफएम टीव्ही वृत्तवाहिनीसाठी काम करत होते.









