निपाणी शहर पोलिसांची कारवाई : 16 लाखांचा मुद्देमाल ताब्यात : चोरटे गोकाक, रायबाग तालुक्यातील

निपाणी : दोघा चोरट्यांकडून 23 दुचाकी निपाणी शहर पोलिसांनी जप्त केल्या. सदर दुचाकींची किंमत 16 लाख 10 हजार ऊपयांचा आहे. लक्ष्मण विरूपाक्ष कणबर्गी (वय 28, रा. अंकलगी ता. गोकाक) व आप्पाजी श्रीकांत राजाप्पगोळ (वय 23, रा. बन्नीबाग ता. हुक्केरी) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. याबाबत निपाणी शहर पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, निपाणी प्रगतीनगर येथून 14 मार्च रोजी सुनील चंद्रकांत सांगावकर यांची दुचाकी चोरीस गेली होती. त्यांनी या संदर्भात निपाणी शहर पोलीस ठाण्यात 16 मार्च रोजी फिर्याद दिली होती. त्यानुसार निपाणी शहर पोलिसांकडून तपास सुरू होता. दरम्यान, शुक्रवारी 17 मार्च रोजी सकाळी 6 वाजता लक्ष्मण कणबर्गी व आप्पाजी राजाप्पगोळ हे दोघे संशयास्पदरित्या फिरताना शहर पोलिसांना आढळून आले.
पोलिसांनी सदर दोघांकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी निपाणी प्रगतीनगर येथून सुनील सांगावकर यांची दुचाकी चोरल्याचे प्रथम कबूल केले. यावेळी निपाणी शहर पोलीस उपनिरीक्षक विनोद पुजारी यांनी तपास गतिमान केला. यानंतर त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच चोरट्यांनी आणखीन दुचाकी चोरल्याचे कबूल करून अंकलगी येथील एका रिकाम्या जागेतील ख•dयामध्ये दुचाकी लपवल्याचे कबूल केले. या माहितीच्या आधारे निपाणी शहर पोलिसांनी बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख एम. वेणूगोपाल, चिकोडीचे डीएसपी बसवराज यलिगार यांच्या मार्गदर्शनानुसार निपाणीचे सीपीआय एस. सी. पाटील, निपाणीचे शहर उपनिरीक्षक विनोद पुजारी, सहाय्यक उपनिरीक्षक एम. जी. मुजावर, हवालदार राजू दिवटे, पी. एम. घस्ती, मंजुनाथ कल्याणी, गजानन भोई, सलीम मुल्ला, सुदर्शन अस्की, यासीन कलावंत, विनोद वाघे यांनी अंदाजे 16 लाख 10 हजार ऊपये किमंतीच्या 23 दुचाकी जप्त केल्या. धारवाड उपनगर हद्दीतील 2, मार्केट पोलीस स्टेशन 2, एपीएमसी 1 मारिहाळ पोलीस स्टेशन हद्दीतील 4, संकेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील 1, बैलहोंगल हद्दीतील 1, निपाणी शहरातील 1 आणि अन्य ठिकाणच्या 13 अशा एकूण 23 दुचाकी जप्त केल्या आहेत. पोलिसांच्या या कामगिरीचे वरिष्ठ पोलिसांकडून कौतुक करण्यात येत आहे.
चैनीसाठी चोरल्या दुचाकी
सध्या कोणतेही कष्ट न करता तात्काळ पैसा मिळविण्यासाठी अनेक युवक वाममार्गाला लागले असल्याचे दिसून येते. लक्ष्मण कणबर्गी व आप्पाजी राजाप्पगोळ या दोघांनी चैनीसाठी दुचाकी चोरल्या असल्याचे पोलिसांना सांगितले आहे. दरम्यान, पालकांनी आपल्या पाल्यांवर लक्ष ठेवताना त्यांचा मित्र परिवार आणि त्यांची चैनी लक्षात घेत त्यांना सजग करणे आवश्यक असल्याचे मत सूज्ञ नागरिकांतून व्यक्त करण्यात येत आहे.









