गेल्यावर्षी आयएसच्या मदतीने मशिदीवर केला होता हल्ला
► वृत्तसंस्था/ शिराज
इराणमध्ये गेल्यावषी ऑक्टोबरमध्ये इराणच्या शिया मशिदीवर हल्ला करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना शनिवारी सार्वजनिकरित्या फाशी देण्यात आली. सरकारी मीडियानुसार, शिराज शहरात पहाटे फाशी देण्यात आली. न्यायालयीन सुनावणीदरम्यान संबंधितांनी आपल्यावरील आरोपांची कबुली दिली होती. अफगाणिस्तानातील आयएसआयएस या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याचेही त्यांनी मान्य केले. मशिदीवर हल्ला करण्यासाठी ‘आयएस’ संघटनेला प्रत्यक्ष मदत केल्याचा आरोप त्यांच्यावर होता.
मोहम्मद रमीझ रशिदी आणि नईम हाशेम घोटाली अशी दोन आरोपींची नावे आहेत. इराणच्या सर्वोच्च न्यायालयाने 16 मार्च रोजी दोघांनाही फाशीची शिक्षा सुनावली होती. गेल्यावषी 26 ऑक्टोबर रोजी शिया मशिदीवर झालेल्या हल्ल्यात 13 लोकांचा मृत्यू झाला होता, तर 30 हून अधिक लोक जखमी झाले होते. यामध्ये अनेक महिला आणि लहान मुलांचाही समावेश होता. आयएस या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.
मशिदीतील हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर 3 सशस्त्र दहशतवाद्यांनी मशिदीत प्रवेश करताच गोळीबार सुरू केल्याचे दिसून आले होते. या हल्ल्यानंतर पोलिसांनी 2 दहशतवाद्यांना अटक केली, तर एक तेथून पळून जाण्यात यशस्वी झाला. तपास यंत्रणांनी काही दिवसातच फरार दहशतवाद्यालाही अटक केली होती. मात्र, त्याचा नंतर ऊग्णालयात मृत्यू झाला होता.
चालू वर्षात 354 दोषींना लटकवले
इराणमध्ये 2023 मध्ये आतापर्यंत 354 लोकांना फाशी देण्यात आली आहे. गेल्यावषीच्या तुलनेत यंदा फाशीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. इराणने 2022 मध्ये 582 लोकांना फाशीची शिक्षा सुनावली होती. त्याचवेळी, पहिल्या 6 महिन्यांत केवळ 261 लोकांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.









