15 ऑगस्टपूर्वी सुरक्षा दलांना मोठे यश, 24 तासात तीन दहशतवादी ठार
वृत्तसंस्था/ श्रीनगर
भारत-पाकिस्तान सीमेवर 15 ऑगस्टपूर्वी सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. सलग दुसऱ्या दिवशी सुरक्षा दलांनी सीमेपलीकडून राज्यात घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. जम्मू विभागातील पुंछ जिह्यातील देगवार तेरवान भागात नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीचा प्रयत्न सोमवारी सकाळी हाणून पाडण्यात आला. सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. तसेच मागील 24 तासात एकंदर तीन दहशतवाद्यांना सुरक्षा यंत्रणांनी यमसदनी पाठविल्याचे स्पष्ट झाले आहे.
सुरक्षा दलांनी सोमवारी पहाटे जम्मू आणि काश्मीरच्या पूंछमधील देगवार तेरवानच्या सामान्य भागात नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याचे संरक्षण अधिकाऱ्याने सांगितले. भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त पथकांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. एक दहशतवादी तात्काळ ठार झाला. दुसऱ्या दहशतवाद्याने मागे पळण्याचा प्रयत्न केला. पण शूर सैनिकांनी त्यालाही कंठस्नान घातले.
पुंछमध्ये पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास दोन संशयित व्यक्ती नियंत्रण रेषा ओलांडून देगवार तेरवान येथील सामान्य भागात जाताना दिसल्या. त्यांना थांबण्याचा इशारा सुरुवातीला जवानांकडून देण्यात आला. मात्र, त्यांनी गोळीबार केल्यानंतर प्रत्युत्तरादाखल लष्करी जवानांनी केलेल्या गोळीबारात दोन्ही दहशतवादी ठार झाले. दुसरीकडे, रविवारी उत्तर काश्मीरमधील कुपवाडा येथील तंगधार सेक्टरमध्ये भारतीय लष्कर आणि कुपवाडा पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला होता. सीमेपलीकडून घुसखोरीचा प्रयत्न करताना झालेल्या चकमकीत एक दहशतवादी मारला गेल्याचे पोलिसांनी सांगितले.









