वृत्तसंस्था / राजौरी
जम्मू-काश्मीरच्या राजौरी भागात भारतीय सेनेच्या तुकडीने घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला आहे. यावेळी झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. या भागातील नौशेरा विभागात पाकव्याप्त काश्मीरमधून दहशतवादी घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात आहेत, अशी माहिती गुप्तचरांकडून प्राप्त झाल्यानंतर सेनेच्या तुकडीने शोध अभियान हाती घेतले होते. घुसखोरीच्या प्रयत्नात असणाऱ्या दोन दहशतवाद्यांना टिपण्यात आले.
सध्या या भागासह पाकिस्तानला लागून असणाऱ्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर दहशतवादविरोधी कारवाई करण्यात येत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये याच महिन्यात विधानसभा निवडणूक होत आहे. ही निवडणूक उधळण्याची योजना दहशतवादी संघटनांनी आखली असल्याची माहिती गुप्तचरांनी मिळविली आहे. त्यामुळे प्रशासनाने या भागात सैनिकी तुकड्या वाढविल्या आहेत.
3 सप्टेंबरला हल्ला
याच परिसरात 3 सप्टेंबरला दहशतवाद्यांच्या एका गटाने सेनेच्या सैनिक तळावर गोळीबार केला होता. त्या घटनेत कोणीही जखमी झाले नव्हते. या परिसरात दहशतवादी लपलेले असल्याच्या महितीवरुन सेनेच्या एका तुकडीने शोध अभियान हाती घेतले होते. त्यावेळी चार दहशतवाद्यांनी हे अभियान रोखण्यासाठी गोळीबार केला होता. तथापि, तो वाया गेला होता. त्यानंतर ही घटना घडली आहे.









