काश्मीरमध्ये तीन दिवसात आठ दहशतवाद्यांचा खात्मा
वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू काश्मीरमध्ये सुरू असलेल्या वार्षिक अमरनाथ यात्रेदरम्यान दहशतवादी सीमेपलीकडून सातत्याने घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, सीमेवर दक्षतेने तैनात असलेले सुरक्षा दल दहशतवाद्यांच्या प्रत्येक हालचाली हाणून पाडत आहेत. सुरक्षा दलांनी तीन दिवसात आठ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. सुरक्षा दलांनी बुधवारी उत्तर काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला असून दिवसभर या भागात शोध व तपास मोहीम सुरू होती. सुरक्षा दलांसाठी हे मोठे यश मानले जात आहे.
कुपवाडामध्ये नियंत्रण रेषेजवळ भारतीय लष्कर, बीएसएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी सुरू केलेल्या संयुक्त मोहिमेत सतर्क जवानांनी बुधवारी पहाटे घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले असून 4 एके रायफल, 6 हँडग्रेनेड आणि इतर युद्धसामग्री जप्त करण्यात आली आहे. आणखी काही दहशतवादी दबा धरून बसल्याच्या शक्यतेने दिवसभर या भागात तपास व शोधमोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांकडील शस्त्रसाठा जप्त करण्यात आल्याची माहिती लष्करी सूत्रांनी दिली.
यापूर्वी पुंछमध्ये सोमवारी-मंगळवारच्या मध्यरात्री पूंछमधील सुरनकोट भागातील शिंद्रा टॉप येथे लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त पथकांनी चकमकीत चार दहशतवाद्यांना ठार केले. त्याचवेळी सोमवारी चक्कन दा बाग परिसरात दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते. त्यांच्याकडून चीन आणि पाकिस्तानमध्ये बनवलेली शस्त्रास्त्रे आणि इतर वस्तू मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आल्या होत्या.









