ऑनलाईन टीम / तरुण भारत :
जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग आणि बारामुल्ला जिल्ह्यात लष्कराचं सर्च ऑपरेशन सुरू आहे. या सर्च ऑपरेशनदरम्यान उरी आणि हथलंगा भागातील घनदाट जंगलात दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले. भारतीय सैन्याचं दहशतवादविरोधी ऑपरेशन युनिट, जम्मू-काश्मीर पोलीस स्पेशल टीम आणि पॅरा कमांडोज या ऑपरेशनमध्ये आहेत. या परिसराला घेराव घालून सर्च ऑपरेशन सुरू आहे.
भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये सुरु असलेल्या चकमकीचा आज चौथा दिवस आहे. लष्कर-ए-तैयबाचे दोन ते तीन दहशतवादी बारामुल्ला जिल्ह्यातील उरी आणि हथलंगा येथील डोंगराळ भागात लपल्याची माहिती आहे. त्यानुसार, कमांड कंट्रोल वाहन, हायटेक सीसीटीव्ही आणि 360 डिग्री कॅमेऱ्याद्वारे दहशतवाद्यांवर लक्ष ठेवलं जात आहे. ड्रोनद्वारे जंगलात दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. घनदाट जंगल आणि डोंगराळ भाग यामुळे हे विशेष पथक तैनात करण्यात आले आहे. याशिवाय टेकडीवर दहशतवाद्यांच्या लपलेल्या ठिकाणावर रॉकेट देखील डागण्यात आले आहेत.









