दिवसभर शोधमोहीम ः सुरक्षा यंत्रणा सतर्क
श्रीनगर / वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरमधील बालाकोटमध्ये सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. सुरक्षा दलाच्या शोध मोहिमेदरम्यान राजौरी स्फोटात सहभागी असलेल्या दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे. या चकमकीनंतर परिसराची नाकाबंदी करून शोधमोहीम हाती घेण्यात आली. मात्र, अन्य कोणीही संशयित सापडला नाही.
गेल्या काही दिवसात काश्मीरमध्ये घुसखोरी आणि छुप्या कारवायांचे प्रमाण वाढले आहे. या कारवायांमुळे भारतीय सुरक्षा दले सतर्क झाली असून दहशतवाद्यांवर वेळीच कारवाई केली जात आहे. अंतर्गत पातळीवरून मिळणाऱया सहकार्यामुळे दहशतवादी संघटना पुन्हा डोके वर काढत असले तरी त्यांना रोखण्याचा आटोकाट प्रयत्न केला जात आहे. 2022 हे वर्ष काश्मीर प्रदेशात दहशतवादविरोधी कारवायांमध्ये अत्यंत यशस्वी असल्याचे सांगितले जात आहे. वर्षभरात जम्मू-काश्मीरमध्ये एकूण 93 चकमकी झाल्या असून त्यामध्ये 42 परदेशी दहशतवाद्यांसह 172 दहशतवादी मारले गेले.









