एके-47 रायफलसह शस्त्रास्त्रे जप्त
► वृत्तसंस्था/ श्रीनगर
उत्तर काश्मीरमधील बांदिपोरा जिल्ह्यात सुरक्षा यंत्रणांनी शनिवारी एका दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला. पोलीस आणि लष्कराच्या संयुक्त पथकाने केलेल्या कारवाईमध्ये एका मृत दहशतवाद्याच्या पत्नीसह आणि अन्य एका दहशतवाद्याला अटक केली. दोघांकडून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळाही जप्त करण्यात आला आहे.
गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे शुक्रवारी बांदिपोरातील पेठकूट परिसरात संयुक्त पथकाने सापळा रचला. तपासणीदरम्यान एका संशयिताने सुरक्षा दलांना पाहून पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र तो पकडला गेला. झडती घेतली असता त्याच्या ताब्यातून एक पिस्तूल, मॅगझिन, आठ राउंड आणि इतर स्फोटक साहित्य जप्त करण्यात आले. शफायत झुबेर ऋषी असे त्याचे नाव असून तो नेसबल सुंबल येथील रहिवासी आहे. त्याच्या चौकशीतून एका महिलेचे नाव पुढे आल्यानंतर पोलिसांनी सदर महिलेवरही अटकेची कारवाई करण्यात आली. मुनिरा बेगम असे महिलेचे नाव असून तिच्या घरातून शस्त्रास्त्रांचा साठा हस्तगत करण्यात आला आहे.









