► वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू काश्मीरमध्ये भारताच्या शत्रूंविरुद्ध सुरक्षा दलांची कारवाई सुरूच आहे. सुरक्षा दलांनी रविवारी पूंछमध्ये दोन दहशतवाद्यांना जिवंत पकडत त्यांच्याकडून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त केला. अटक केलेल्या आरोपींची ओळख पटली आहे. तारिक शेख (राहणार आजमाबाद) आणि रियाज अहमद (राहणार चेंबर गाव) अशी सदर दहशतवाद्यांची नावे आहेत. दोन्ही आरोपी बऱ्याच काळापासून दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असून सीमेपलीकडे बसलेल्या दहशतवादी संघटनांच्या संपर्कात असल्याचे प्राथमिक चौकशीतून स्पष्ट झाले आहे.
सुरक्षा दलाला गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे दोन्ही दहशतवाद्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. पोलिसांनी तारिक शेख याच्या आजमाबादमधील घरावर धाड टाकली. तसेच जालियन गावात त्यांच्या भाड्याच्या घरात छापा टाकला. छापेमारीदरम्यान दोन आधुनिक असॉल्ट रायफल आणि मोठ्या प्रमाणात जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची चौकशी सुरू आहे. सुरक्षा संस्था त्यांच्या नेटवर्कमध्ये आणखी किती लोक सामील आहेत आणि शस्त्रांचा हा साठा कुठे वापरला जाणार होता हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. सदर शस्त्रास्त्रे व स्फोटके काश्मीर खोरे आणि राजौरी-पूंछ सेक्टरमध्ये सक्रिय असलेल्या मॉड्यूलना पोहोचवण्यात येणार होती, असे प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे. अलिकडच्या काळात सीमेपलीकडून घुसखोरी आणि शस्त्रास्त्रे पुरवण्याचे प्रयत्न वाढले आहेत. परंतु स्थानिक पोलीस आणि सुरक्षा दलांच्या सतर्कतेमुळे दहशतवादी संघटनांचे अनेक मनसुबे अयशस्वी झाले आहेत.
दहशतवाद संपवण्याचा निर्धार
जम्मू काश्मीर पोलीस आणि इतर सुरक्षा संस्था एकत्रितपणे काश्मीर खोऱ्यातील दहशतवादाची पाळेमुळे उखडून टाकण्यासाठी कटिबद्ध आहेत. अशा सततच्या कारवायांमुळे केवळ दहशतवादी नेटवर्क कमकुवत होत नाही तर राज्यात शांतता आणि सामान्यता पुनर्संचयित होणे फार दूर नाही असा सामान्य लोकांचा विश्वासही बळकट होत आहे. पोलिसांनी लोकांना संशयास्पद कारवायांबद्दलची माहिती त्वरित शेअर करण्याचे आवाहन केले आहे. कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास वेळीच कारवाई करण्याचे निर्देश सुरक्षा जवानांना देण्यात आले आहेत. या माध्यमातून दहशतवाद मुळापासून उखडून टाकता येईल असा विश्वास सुरक्षा यंत्रणांना आहे.
Previous Articleजागतिक स्पर्धेत सात्विक-चिराग जोडीच्या पदरात कांस्यपदक
Next Article इंडोनेशियात गदारोळ, अध्यक्षांचा चीन दौरा रद्द
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









