‘अल-कायदा’शी संबंधित कागदपत्रे जप्त ः आसाम पोलिसांना मोठे यश
गुवाहाटी / वृत्तसंस्था
आसाम पोलिसांनी रविवारी गोवालपारा येथून दोन संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. झाडाझडतीदरम्यान त्यांच्याकडून अल-कायदा, जिहादी घटक, पोस्टर्स आणि इतर संशयास्पद कागदपत्रे असे साहित्य जप्त करण्यात आले. याशिवाय मोबाईल फोन, सिमकार्ड आणि ओळखपत्र जप्त करण्यात आले आहेत. हे दोन्ही दहशतवादी ‘अल-कायदा’च्या भारतीय उपमहाद्वीप (एक्यूआयएस) शाखा आणि अन्सारुल्ला बांगला टीमशी (एबीटी) संबंधित आहेत. सदर संशयितांचा बारपेटा आणि मोरीगाव मॉडय़ूलशी थेट संबंध असल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे.
आसाम पोलिसांनी रविवारी सकाळी गोलपारा येथे दोघा संशयित दहशतवाद्यांना ताब्यात घेतले. दोन्ही संशयितांना काही तासांच्या चौकशीनंतर अटक करण्यात आली. अब्दुल सुभान आणि जलालुद्दीन शेख अशी दोघांची नावे असल्याची माहिती गोलपारा जिह्याचे पोलीस अधीक्षक राकेश रेड्डी यांनी दिली. जुलैमध्ये अटक करण्यात आलेल्या अब्बास अलीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. दोघांकडेही जिहादी घटकांशी संबंधित दस्तावेज सापडले असून त्यांची सखोल चौकशी करून संपर्कातील इतरांचा शोध घेतला जाणार असल्याचेही त्यांनी पुढे सांगितले.
अनेक आक्षेपार्ह साहित्य जप्त
संशयित दहशतवाद्यांच्या घराच्या झडतीदरम्यान अल-कायदा, जिहादी घटकांशी संबंधित अनेक गुन्हेगारी साहित्य जप्त करण्यात आले आहे, असे पोलीस अधिकाऱयांनी सांगितले. यामध्ये पोस्टर्स, पुस्तके, मोबाईल फोन, सिमकार्ड, ओळखपत्र आणि इतर कागदपत्रांचा समावेश आहे.
गुन्हा दाखल
अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांवर भारतीय दंड संहितांच्या कलम 120-बी, 121, 121öए आणि ‘युए-पी’च्या कलम 18, 18(बी), 19 आणि 20 अंतर्गत मटिया पोलीस स्टेशनमध्ये नवीन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी 28 जुलै रोजी आसाममध्ये एक्यूआयएस आणि एबीटीसारख्या जागतिक दहशतवादी संघटनांशी कथित संबंध असल्याच्या कारणावरून 11 जणांना ताब्यात घेण्यात आले होते.
बांगलादेशी दहशतवाद्यांनाही आश्रय
बांगलादेशातून भारतात आलेल्या जिहादी दहशतवाद्यांनाही आरोपींनी आश्रय दिल्याचे राज्यातील उच्च पोलीस अधिकाऱयाने सांगितले. अनेक बांगलादेशी नागरिक फरार असून अटक केलेल्या दहशतवाद्यांनी त्या दहशतवाद्यांना गोलपारा येथे आश्रय दिला होता. या संशयितांनी डिसेंबर 2019 मध्ये मटिया पोलीस स्टेशन अंतर्गत सुंदरपूर तिलपारा मदरसा येथे धर्मसभेचे आयोजन केले होते. या सभेसाठी ‘एक्यूआयएस’शी संबंधित अनेक बांगलादेशी नागरिकांना बोलावण्यात आले होते.









