97 विमानांच्या खरेदीसाठीच्या करारावरहीहोणार स्वाक्षरी
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशात स्वदेशी संरक्षण उत्पादन वाढवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल म्हणून हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) सप्टेंबर महिन्यात दोन तेजस मार्क-1ए लढाऊ विमाने भारतीय हवाई दलाला देणार आहे. संरक्षण सचिव आरके सिंह यांनी नुकतीच यासंबंधी माहिती दिली. पहिल्या दोन विमानांच्या पुरवठ्यानंतर अतिरिक्त 97 तेजस विमानांच्या खरेदीसाठी सरकार ‘एचएएल’सोबत नवीन करारावर स्वाक्षरी करण्याचा विचार करत आहे. हा करार सुमारे 67,000 कोटी रुपयांचा असणार आहे. सप्टेंबरच्या अखेरीस शस्त्रांनी सुसज्ज असलेले दोन तेजस मार्क-1ए हवाई दलाला सुपूर्द केले जातील अशी अपेक्षा आहे.
सध्या हवाई दलाकडे 38 तेजस विमाने
सध्या हवाई दलाकडे सुमारे 38 तेजस विमाने सेवेत असून 80 हून अधिक विमानांची निर्मिती सुरू आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये, संरक्षण मंत्रालयाने 83 तेजस मार्क-1ए विमानांच्या खरेदीसाठी एचएएलसोबत 48,000 कोटी रुपयांचा करार केला होता. परंतु त्यांची डिलिव्हरी लांबली आहे. या विलंबामागे अमेरिकन कंपनी जीई एरोस्पेसने विमानाचे इंजिन वेळेवर पुरवण्यात दिरंगाई केल्याचे मुख्य कारण सांगितले जात आहे.
मिग-21 ला पर्याय
तेजस मार्क-1ए हे एकल-इंजिन, बहु-भूमिका लढाऊ विमान असून भारतीय हवाई दलाच्या जुन्या मिग-21 विमानांना पर्याय म्हणून डिझाइन केलेले आहे. सध्या हवाई दलाच्या स्क्वॉड्रनची संख्या 31 वर आली आहे, तर अधिकृत संख्या 42 आहे. अशा परिस्थितीत हवाई दलाची ताकद वाढवण्यासाठी तेजस विमानांचा समावेश करणे खूप महत्वाचे आहे. तेजस केवळ हवाई संरक्षणच नाही तर सागरी देखरेख आणि हल्ल्याच्या कारवाया देखील यशस्वीरित्या पार पाडण्यास सक्षम आहे.









