एफआयआर दाखल : आणखी काही जणांचा सहभाग?
प्रतिनिधी/ बेळगाव
रौडीशीटरवरील गोळीबार प्रकरणी शुक्रवारी रात्री उशिरा बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात एफआयआर दाखल केला आहे. गोळीबारानंतर गणेशपूर रोडवरून आरोपी फरारी झाल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले असून त्यांच्या अटकेसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. 24 तासांनंतरही या प्रकरणाचे धागेदोरे सापडले नाहीत.
गोळीबारात जखमी झालेल्या प्रफुल्ल बाळकृष्ण पाटील याचा भाऊ रोहित याने दिलेल्या फिर्यादीवरून दोघांची नावे घालून एफआयआर दाखल केला आहे. आणखी चार ते पाच जणांचा यामध्ये सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला असून बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ, उपनिरीक्षक लक्काप्पा जोडट्टी व त्यांचे सहकारी पुढील तपास करीत आहेत.मोटारसायकल व कारमधून पाठलाग करून पाळत ठेवून गोळीबार केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. मध्यरात्री 2.30 च्या सुमारास ही घटना घडली. जखमी प्रफुल्लवर खासगी इस्पितळात उपचार करण्यात येत असून त्याला अद्याप नीट बोलता येत नाही. तो बरा झाल्यानंतरच या घटनेसंबंधी त्याच्याकडून माहिती मिळणार आहे.
गोळीबारानंतर कारमधून संशयित आरोपींनी गणेशपूर रोडवरून कल्लेहोळच्या दिशेने पलायन केल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून दिसून येते. गणेशपूर रोडबरोबरच शहरातील वेगवेगळ्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले असून दोघा संशयितांविषयीही माहिती मिळविण्यात येत आहे. प्रफुल्लच्या भावाने फिर्यादीत ज्या नावांचा उल्लेख केला आहे, त्यांच्याविषयीही माहिती मिळविण्यात येत आहे.
यासंबंधी भारतीय न्याय संहिता 189(2), 191(3), 109, सहकलम 190 बरोबरच भारतीय शस्त्रास्त्र कायद्यानुसार एफआयआर दाखल केला आहे. वर्षापूर्वी झालेल्या भांडणातून गोळीबाराची ही घटना घडली असावी, असा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. फिर्यादीत दोन राजूंच्या नावांचा उल्लेख केला आहे. तपासाच्यादृष्टीने पोलिसांनी ही नावे गुप्त ठेवली आहेत. गेल्या दोन दिवसांतील घडामोडी लक्षात घेता गोळीबाराच्या घटनेनंतर 24 तासांनंतरही धागेदोरे सापडले नाहीत, हे लक्षात येते.









