प्रतिनिधी /पणजी
आजोशी येथली चर्चची सुमारे चार लाख रुपये किमतीची घंटा चोरी प्रकरणी दोन संशयित चोरटय़ांना आगशी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला असून घंटाही जप्त केली आहे. याबाबत माजी पंचसदस्य सिप्रियान अल्फोन्सो व चर्चचे फादर यांनी तक्रार दाखल केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या संशयित अजमेर आलम (18 उत्तर प्रदेश) व चुना खान (36 बिहार) दोघेही तिवरे फोंडा येथे राहत होते. शुक्रवारी रात्री चोरीची घटना घडली आहे. चर्चला नवीन घंटा लावण्यासाठी 250 किलो ग्रॅम वजनाची पितळीची घंटा आणली होती. दोन्ही चोरटे रात्रीच्यावेळी रिक्षा घेऊन आले आणि घंटा पळविली. हे दृश्य त्या परिसरात असलेल्या सीसीटीव्हीत कैद झाले होते. त्यानुसार पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यावर संशयितांची ओळख पटली. त्यानंतर सापळा रचून संशयितांना अटक करण्यात आली. अवघ्या 24 तासांत चोरटय़ांना अटक करून घंटा जप्त केली. या कामीगरीबाबत माजी पंच सदस्य सिप्रियान अल्फोन्सो यांनी पोलासांचे आभार व्यक्त केले.









