संकटे कधी एकटी येत नाहीत, असे वचन आहे. त्यांची जणू मालिकाच सुरु होते. उत्तर प्रदेशातील ऊर्वशी जैन आणि निती जैन या दोन भगिनी. दोघींचेही विवाह झालेले. दिल्या घरी सुखी होत्या. तथापि, काही वर्षांमध्येच ऊर्वशीचे पती अपघातात निधन पावले. हे संकट कमी होते की काय, म्हणून नीतीच्या पतीने तिला घटस्फोट दिला. दोघींच्या पित्याचे तर आधीच निधन झाले होते.
परिस्थिती कठीण होती. दोघीनांही माहेरी यावे लागले. पण तेथे तर ‘उद्याची भ्रांत’ होती. दुपारच्या जेवणाची सोय झाली तर रात्री काय असा प्रश्न होता. त्यातच त्यांच्या आईचेही प्राणोत्क्रमण झाले. जणू दोघींवर आकाशच कोसळले.
पण निर्धारी माणसे संकटाचे रुपांतर संधीत करतात. कोरोनाने त्यांनी ही संधी मिळवून दिली. त्यांनी थोडीशी पदरमोड करुन घरीच मास्क बनविण्याचा उद्योग सुरु केला. तो चांगला चालू लागल्यानंतर बेकरी उत्पादने बनविण्याचा विचार करुन त्याही उद्योगात हात घातला. आता मास्कचा खप कमी झाला असला तरी घरगुती बेकरी उत्पादनांचा खप वाढत आहे. ही उत्पादने विकण्यासाठी घराच्या बाहेरच रस्त्यानजीक स्टॉल त्यांनी टाकला. अद्याप हा व्यवसाय बाल्यावस्थेत आहे. मात्र, तो त्यांना प्रतिदिन दीड ते दोन हजारांचा नफा मिळवून देतो. अशा प्रकारे त्यांनी आल्या संकटाला निर्धाराने परतवून लावत, सन्मानाचे जीवन स्वीकारले आहे.









