सदाशिवनगरात बेकरी तर रविवार पेठेत स्टेशनरी दुकान भस्मसात : बेकरीचे 75 लाखांच्या मशिनरीचे नुकसान
बेळगाव : गुरुवारी मध्यरात्रीनंतर मुख्य बाजारपेठ व सदाशिवनगर येथील बेकरी व इतर दुकानांना आग लागून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. या दोन्ही घटना शॉर्टसर्किटने घडल्याचे सांगण्यात येते. सदाशिवनगर येथील विजय बेकरीला शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत सुमारे 70 ते 75 लाख रुपयांची मशिनरी, भट्टी, कच्चा माल जळून खाक झाला आहे. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास बेकरीतून धूर दिसल्याने स्थानिक नागरिकांनी बेकरीच्या संचालकांशी संपर्क साधला. विनोद कदम हे हनुमाननगरला राहतात. घटनेची माहिती मिळाल्यानंतर लगेच ते सदाशिवनगर येथे दाखल झाले. अग्निशमन दल व 112 ला संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही. आपले कामगार व स्थानिक नागरिकांना घेऊन त्यांनी आग आटोक्यात आणली. शुक्रवारी सायंकाळी यासंबंधी एपीएमसी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
दुसरी घटना मुख्य बाजारपेठेतील रविवार पेठ-कांदा मार्केट परिसरात घडली आहे. पृथ्वी नॉवेल्टीज व त्याच्या शेजारच्या दुकानाला आग लागून मोठ्या प्रमाणात स्टेशनरी साहित्य, प्लास्टिकच्या वस्तू जळून खाक झाल्या आहेत.मध्यरात्री 2.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून आगीने रौद्ररूप धारण केल्यानंतर नागरिकांनी ही घटना अग्निशमन दलाला कळविली. जिल्हा अग्निशमन अधिकारी शशिधर निलगार, शिवाजी कोरवी, एम. एम. जकुटी, सदानंद राचण्णावर, राजकुमार बोगार, रवी पुजार, प्रकाश पाटील आदींसह अग्निशमन दलाचे पंधराहून अधिक जवान दाखल झाले. वाहतूक विभागाचे एसीपी जोतिबा निकम व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. आग विझविण्यासाठी दोन बंब वापरण्यात आले. यासंबंधी मार्केट पोलीस स्थानकाशी संपर्क साधला असता अद्याप एफआयआर दाखल झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.









