कोल्हापूर :
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या थेटपाईपलाईन योजनेचे काळम्मावाडी उपसा केंद्रातील दोन पंप शुक्रवार पासून बंद आहेत. याचा परिणाम शहरातील पाणीपुरवठ्यावर झाला आहे. ए आणी बी वॉर्डमधील काही भागातील पाणीपुरवठा ठप्प झाला आहे, तर ई वॉर्डमधील बहुतांशी भागावर याचा परिणाम जाणवला. शहरातील ए, बी आणि ई वॉर्डमध्ये गेल्या दोन दिवसांपासून पाणी संकट आहे. आणखीन दोन दिवस हे संकट राहण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या वतीने 15 टॅकरची व्यवस्था करण्यात आली आहे.
शहराला स्वच्छ व मुबलक पाणी पुरवठा करण्यासाठी थेट पाईपलाईन योजना कार्यान्वित करण्यात आली. मात्र ही योजना सुरु झाल्यापासून शहराचा पाणीपुरवठा विविध कारणांमुळे ठप्प होत आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात थेट पाईपलाईनमध्ये दोन वेळा बिघाड झाला तर उपसा केंद्र येथे महावितरण कंपनीने देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने दोन वेळा पाणी उपसा बंद राहिला. जानेवारी महिन्यात एकूण 4 वेळा पाणी पुरवठा बंद राहिला आहे. शुक्रवारपासून काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेस उपसा करणारे दोन पंप बंद झाले आहेत. पंपाचे व्हिएमडी ड्राईव्ह बंद पडले आहेत. तांत्रिक कारणामुळे हे दोन पंप बंद असल्यामुळे शहरातील पाणीपुरवठ्यावर याचा परिणाम झाला आहे. गेल्या तीन दिवसांपासून ही तांत्रिक समस्या सोडवण्यासाठी गेल्या 72 तासांपासून प्रयत्न सुरु आहेत. मात्र सोमवारी रात्रीही समस्या कायम राहिली. यामुळे सध्या थेट पाईपलाईन योजनेचे दोनच पंप सुरु असून, याद्वारे उपसा सुरु आहे. यामुळे पुईखडी जलशुद्धीकरण केंद्रावर अवलंबून असणारे ए वॉर्ड आणि बी वॉर्ड मधील काही भाग यासह ई वॉर्डमधील बहुतांशी भागावर शुक्रवारपासून पाणीबाणीचे संकट निर्माण झाले आहे. काही भागात संपूर्ण पाणीपुरवठा ठप्प झाला असून, काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा सुरु आहे. कमी दाबाने पाणी पुरवठा होणाऱ्या भागांमध्ये 15 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती जलअभियंता हर्षजीत घाटगे यांनी दिली.
- बालिंगा उपसा केंद्राजवळ पाणी पातळीत घट
बालिंगा उपसा केंद्र येथील नदीची पाणीपातळी कमी झाली असल्यामुळे, येथील उपसा कमी झाला आहे. दररोज होणारा 60 एमएलडी पाणी उपसा कमी होऊन सध्या 40 एमएलडीवर आला आहे. यामुळे बालिंगा उपसा केंद्रावर अवलंबून असणाऱ्या सी आणी डी वॉर्डवरही पाणी संकट उद्भवले आहे. महापालिकेने नदीची पाणी पातळी वाढवण्यासाठी पाटबंधारे विभागसोबत पत्रव्यवहार केला असून, लवकरच धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे. यानंतरच बालिंगा उपसा केंद्रातून पूर्ण क्षमतेने पाणी उपसा होणार आहे. या दोनही समस्या एकाचवेळी निर्माण झाल्याने शहरावर पाणी संकट घोंगावत आहे.








