नाला साफ करताना दुर्घटना : तीन अधिकारी निलंबित
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
तिहार कारागृहातील तुरुंग क्रमांक 8 मध्ये नाला साफ करताना दोन कैद्यांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दोन्ही कैदी खून प्रकरणात दोषी आढळले होते. सध्या ते जन्मठेपेची शिक्षा भोगत होते. या घटनेनंतर तिहार प्रशासनाने तातडीने कारवाई करत उप जेलर, सहाय्यक जेलर आणि वॉर्डन यांना तात्काळ निलंबित केले. या घटनेनंतर तिहार प्रशासनाने या प्रकरणाचा तपास तिहारच्या उपमहानिरीक्षकांकडे (डीआयजी) सोपवला आहे. तसेच न्यायालयीन चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी स्वतंत्र तपास सुरू केला आहे. त्यांचा मृत्यू पाण्यात बुडून झाला की इतर काही कारणाने झाला याबाबत तपास केला जाणार आहे.
तिहार तुरुंगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तुरुंग क्रमांक 8 च्या मध्यभागी एक रस्ता असून रस्त्याच्या कडेला नाले बांधले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस पडत असल्याने हे नाले पाण्याने भरले होते. हे नाले साफ करत असताना पाण्यात बुडून दोन्ही कैदी मृत झाल्याचे सांगण्यात आले. या घटनेच्या वेळी तेथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी ताबडतोब कैद्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु दोघांनाही वाचवता आले नाही. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी दीनदयाळ उपाध्याय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच नेमके कारण स्पष्ट होईल. तिहार कारागृह प्रशासनावर यापूर्वीही कैद्यांच्या सुरक्षेत त्रुटी असल्याचा आरोप करण्यात आला आहे.








