इस्रायल-हमास संघर्षादरम्यान अमेरिकेचे परराष्ट्र, संरक्षणमंत्री भारत दौऱ्यावर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटोनी ब्लिंकन यांच्या नेतृत्वाखालील एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ टू प्लस टू मंत्रिस्तरीय चर्चेसाठी शुक्रवार, 10 नोव्हेंबर रोजी भारताला भेट देणार आहे. या प्रतिनिधी मंडळात संरक्षणमंत्री लॉयड ऑस्टिनही सहभागी होणार आहेत. टू प्लस टू फ्रेमवर्कनुसार दोन्ही देशांमधील ही पाचवी बैठक असल्याचे प्रशासकीय सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या दोन प्रमुख नेत्यांची भारत भेट ही एक मोठी घटना आहे. विशेष म्हणजे पश्चिम आशियातील परिस्थिती लक्षात घेता अमेरिका संघर्ष थांबवण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे. अशा परिस्थितीत दोन्ही देशांमध्ये या मुद्यावर महत्त्वाची चर्चा होऊ शकते. याशिवाय दोन्ही देशांचे परराष्ट्र आणि संरक्षण मंत्री द्विपक्षीय बैठक घेणार आहेत. भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग आणि परराष्ट्रमंत्री जयशंकर हे आपल्या समकक्षांसोबत स्वतंत्र बैठकीमध्ये सहभागी होतील. मंत्रीस्तरीय चर्चेनंतर ब्लिंकन आणि ऑस्टिन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.
2 ते 10 नोव्हेंबर दरम्यान अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकन तेल अवीव (इस्रायल), अम्मान (जॉर्डन), अंकारा (तुर्की), टोकियो (जपान), सोल (कोरिया प्रजासत्ताक) आणि नवी दिल्ली (भारत) आदी ठिकाणांच्या विदेश दौऱ्यावर असल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी सांगितले. याचदरम्यान संरक्षण मंत्री ऑस्टिन हेसुद्धा भारत-पॅसिफिक प्रदेशाच्या नवव्या भेटीचा एक भाग म्हणून ब्लिंकन यांच्यासमवेत भारताला भेट देतील. भारत भेटीनंतर ऑस्टिन दक्षिण कोरिया आणि इंडोनेशियाला रवाना होतील.









