वृत्तसंस्था/ बर्मिंगहम
राष्ट्रकुलमध्ये सहभागी होणाऱया भारतीय महिला क्रिकेट संघातील दोन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने त्या संघासोबत बर्मिंगहमला जाऊ शकल्या नाहीत. या स्पर्धेत भारताचा सलामीचा सामना शुक्रवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे.
भारतीय महिला संघ रविवारी सकाळी बर्मिंगहमला रवाना झाला, त्यात या दोन खेळाडूंचा समावेश नव्हता. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी, याआधी एका खेळाडूला कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले होते. या स्पर्धेला रवाना होण्यापूर्वी भारतीय संघाचे सराव शिबिर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत घेण्यात आले होते. राष्ट्रकुलमध्ये प्रथमच महिला क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे.
‘आणखी एक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळली असून प्रयाण करण्यापूर्वी याबाबत स्पष्ट झाले. त्यामुळे दोघीनाही भारतातच ठेवण्यात आले आहे,’ असे भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या एका पदाधिकाऱयाने सांगितले. प्रोटोकॉलनुसार दोघींचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरच त्या संघात सामील होऊ शकतील, असे बीसीसीआयच्या सूत्राने सांगितले. मात्र त्यांची नावे उघड करण्यात आलेली नाहीत. दोन खेळाडू भारतातच असल्यामुळे पहिल्या सामन्यात त्या सहभागी होऊ शकणार नाहीत, हे स्पष्ट आहे. यातील दुसरा सामना 31 जुलै रोजी पाकिस्तानविरुद्ध आणि शेवटचा साखळी सामना बार्बाडोसविरुद्ध 3 ऑगस्ट रोजी होणार आहे. अंतिम सामन्यासह सर्व सामने एजबॅस्टन येथेच खेळविले जाणार आहेत. उपांत्य व अंतिम सामन्यांची तिकीटविक्री याआधीच पूर्ण झाली असल्याचे आयोजकांनी सांगितले. ‘अशा प्रकारच्या स्पर्धेत खेळण्याचा अनुभव आम्हाला प्रथमच मिळत असल्याने आमच्यासाठी ही स्पर्धा फार महत्त्वाची आहे,’ असे कर्णधार हरमनप्रीत सिंगने प्रयाण करण्यापूर्वी म्हटले होते.









