वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सप्टेंबर महिन्यात चीनमधील हेंगझोयू येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघातून निवडलेला वुशू खेळाडू ओवेस सरवार आणि एक जलतरणपटू उत्तजक चाचणीत दोषी आढळल्याने त्यांच्यावर हंगामी स्वरुपाची निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
23 वर्षीय ओवेस सरवार हा वुशू प्रकारामध्ये या आगामी स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे. दरम्यान सरवारची उत्तेजक चाचणी घेण्यात आली. त्याच्या मूत्रल नमुन्यामध्ये निर्बंध घातलेले द्रव आढळल्याने त्याच्यावर हंगामी स्वरुपाची निलंबनाची कारवाई केल्याची माहिती नाडाच्या प्रवक्त्याने दिली आहे. लडाखचा सरवार हा आगामी आशियाई स्पर्धेत वुशू या क्रीडा प्रकारात 70 किलो वजन गटात भारताचे प्रतिनिधीत्व करणार होता. सदर स्पर्धा 23 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल एक जलतरणपटूही उत्तेजक चाचणीत दोषी ठरल्याचे सांगण्यात आले. मात्र या जलतरणपटूचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही.









