पेठ वडगाव / प्रतिनिधी
अज्ञात वाहनाच्या धडकेत फिरायला गेलेल्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. शालन बाळू वडर (वय ७०, रा. कुरळप, ता.वाळवा, जि.सांगली) व दिलीप विट्ठल पाटील (वय ५८, रा. भादोले, ता. हातकणंगले) अशी मृतांची नावे आहेत. हा अपघात वडगाव- आष्टा रस्त्यावर भादोले गावच्या हद्दीत मसोबावाडी फाटा येथे पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास झाला. अपघाताची नोंद वडगाव पोलिसात झाली आहे.
या बाबत पोलीसातून व घटनास्थळावरून घेतलेली माहिती अशी की, वडगाव-भादोले रस्त्यावर मसोबावाडी फाट्यावर पेठ वडगावहून आष्ट्याच्या दिशेने निघालेल्या अज्ञात वाहनचालकाने सकाळी फिरायला निघालेल्या शालन बाळू वडर (वय ७०,रा. कुरळप,जि.सांगली) व दिलीप विठ्ठल पाटील यांना जोरदार धडक देवून निघून गेले. या धडकेत शालन यांचा हात तुटून पंधरा फुट अंतरावर पडला होता तर त्यांच्या डोक्यास चेहऱ्यास मार लागून मोठा रक्तस्त्राव झाला होता. तर काही अंतरावर दिलीप पाटील यांना दिलेल्या धडकेत त्यांच्या पोटावरून वाहनाचे चाक गेल्याने जागीच मृत्यू झाला. या भीषण धडकेत दोन्ही मृतदेह छिन्नविच्छिन्न आवस्थेत रस्त्यावर पडले होते.
अपघाताची वर्दी वडगाव पोलीस ठाण्यात देण्यात आली. अपघातस्थळी वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भैरव तळेकर, पीएसआय लक्ष्मण सरगर, अर्चना पाटील व पोलीस कर्मचारी यांनी धाव घेतली परिसरातील नागरिकांच्या सहकार्याने मृतदेह झाकून ठेवले. पंचनामा करून मृतदेहाचे शवविच्छेदन भादोले ग्रामीण रुग्णालयात करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
मयत शालन वडर या भादोले येथे आज असलेल्या भादोले यात्रेसाठी माहेरी आल्या होत्या. सकाळी फिरून येतो म्हणून त्या वडगाव- आष्टा रस्त्यावर आल्या होत्या. तर हालसिद्धनाथ साखर कारखाना निपाणी येथे नोकरीस असलेले व भादोले येथील रहिवाशी दिलीप पाटील हे दैनंदिन जात असलेल्या किणी रस्त्यावर फिरायला न जाता वडगाव-भादोले रस्त्यावर फिरायला आले होते. अपघाताची माहिती मिळताच भादोले ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली होती. वडगाव पोलिसांनी अपघातामुळे विस्कळीत वाहतूक सुरळीत केली. अपघाताची वर्दी गणपती पाटील यांनी वडगाव पोलिसात दिली असून अपघाताची नोंद झाली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गिरीश शिंदे करत आहेत. धडक देवून निघून गेलेल्या वाहनाचा तपास वडगाव पोलीस करत आहेत.