बेळगाव : दारू दुकान मालकाने पाठविले आहे, असे सांगत गणेशोत्सवाच्या नावे वर्गणी गोळा करणाऱ्या दोघांना दारू दुकान मालकाने चोप दिला आहे. मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने याप्रकरणी कुलगोड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला असून मारहाण करणाऱ्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अभिषेक परुशेट्टी (रा. कुलगोड) असे पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या दारू दुकान मालकाचे नाव आहे. तर संतोष अंगडी आणि संजू भोसले (दोघेही रा. कुलगोड) अशी मारहाण झालेल्यांची नावे आहेत.
अभिषेक यांचे कुलगोड शहरात जनता वाईन्स नावाने दारू दुकान आहे. गणेशोत्सवासाठी अभिषेक यांनी वर्गणी गोळा करण्यासाठी आम्हाला पाठविले आहे, असे सांगत दोघेजण गावात लोकांकडून वर्गणी गोळा करत होते. ज्या कोणाकडे रोख स्वरुपात पैसे नव्हते त्यांनी फोन पेच्या माध्यमातून दोघांकडे वर्गणी जमा केली होती. ही माहिती दारू दुकान मालक अभिषेक यांना समजल्यानंतर त्यांनी रागाच्या भरात वरील दोघांना बेदम मारहाण केली. मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. ही बाब जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने कुलगोड पोलिसांना संपर्क साधून कारवाई करण्याची सूचना केली.
त्यानुसार पोलिसांनी दारू दुकान मालक अभिषेक याला पोलीस स्थानकात बोलावून विचारपूस केली असता सुरुवातीला त्याने वरील दोघांनी दुकानातून दारू घेतल्यानंतर 5 रुपये कमी दिल्याने त्यांना मारहाण केल्याचे सांगितले. पण अधिक चौकशी केली असता दोघांनी अभिषेकचे नाव सांगत गणपतीची वर्गणी गोळा केल्याच्या कारणातून मारहाण करण्यात आल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी अभिषेक विरोधात गुन्हा दाखल करून नोटीस दिली आहे. कोणीही गणेशोत्सव किंवा अन्य कोणत्याही उत्सवासाठी नागरिकांकडून बळजबरीने पैसे वसूल करू नयेत. जबरदस्ती करून पैसे वसूल करणे कायद्याने गुन्हा आहे, असे जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. गुळेद यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.









