विजापूर रोडवर हॉटेलमध्ये लुटमार; मित्रमंडळावर हिंसक हल्ला
सोलापूर : दोघा मित्र मैत्रिणींवर धारदार कोयत्याने हल्ला करुन त्यांच्याकडील २ लाख १७ हजार रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या चेन लुटण्यात आल्या. ही घटना सोमवार, २० ऑक्टोबर रोजी रात्री ८.१५ वाजण्याच्या सुमारास विजापूर रोड सोलापूर परिसरात असलेल्या हॉटेल आदित्य या ठिकाणी घडली.
याप्रकरणी वेंकटेश संजय बुधले (वय २९ रा. योजना हाउसिंग सोसायटी भारतीय विद्यापीठ विजापूर सोलापूर) यांनी तीन अज्ञात व्यक्तींविरुध्द विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सोमवार, २० ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हे विजापूर रोडवर असलेल्या हॉटेल आदित्य येथे थांबले होते. त्यावेळी तीन अनोळखी तिघा तरूणांनी त्यांच्या हातातील धारदार कोयत्याने फिर्यादीच्या कपाळावर तसेच डोक्यात, डाव्या गालावर व डाव्या दंडावर व उजव्या पायाच्या गुडघ्याखाली बार केले.
डोक्यात दगड मारून फिर्यादीच्या गळ्यातील व मैत्रिणीच्या गळ्यातील असे १ लाख १२ हजार रुपये किमतीची १६ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन तसेच १ लाख ५ हजार रुपये किमतीची १५ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन असा एकूण २ लाख १७ रुपयाचा ऐवज चोरून नेला. तसेच फिर्यादीच्या मैत्रिणीस हाताने मारहाण करून जबरदस्तीने चेन हिसकावून घेतली. तपास सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड हे करत आहेत.








