राजदच्या माजी खासदाराला जन्मठेप
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
राष्ट्रीय जनता दलाचे माजी खासदार प्रभुनाथ सिंह यांना सर्वोच्च न्यायालयाने 1995 मधी मशरख दुहेरी हत्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच न्यायालयाने मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाख रुपये तर जखमींच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची भरपाई देण्याचा आदेश दिला आहे. तत्पूर्वी सुनावणीदरम्यान न्यायाधीश संजय कौल यांनी यापूर्वी असा खटला कधीच हाताळला नव्हता असे उद्गार काढले होते.
प्रभुनाथ सिंह यांना याप्रकरणी पाटणा येथील न्यायालयाने 2008 साली निर्दोष ठरविले होते. तर 2012 मध्ये पाटणा उच्च न्यायालयाने देखील निर्दोषत्वाचा निर्णय योग्य ठरविला होता. परंतु पीडिताच्या भावाने सर्वोच्च न्यायालयात याविरोधात धाव घेतली होती. न्यायालयाने 18 ऑगस्ट रोजी प्रभुनाथ यांना दोषी ठरविले होते. प्रभुनाथ हे सध्या आमदार अशोक सिंह यांच्या हत्येप्रकरणी झारखंडच्या हजारीबाग तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत.
1995 मध्ये बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान छपरा येथील मशरखमध्ये 18 वर्षीय राजेंद्र राय आणि 47 वर्षीय दरोगा राय यांची मतदान केंद्रानजीकच हत्या करण्यात आली होती. दोघांनी प्रभुनाथ यांच्या सांगण्यानुसार मतदान न केल्याने ही हत्या करण्यात आल्याचा आरोप होता. याच निवडणुकीत अशोक सिंह यांनी प्रभुनाथ सिंह यांना पराभूत केले होते. यानंतर प्रभुनाथ यांनी 90 दिवसांच्या आत अशोक सिंह यांची हत्या करण्याची धमकी दिली होती. 3 जुलै 1995 रोजी अशोक सिंह यांची हत्या झाली होती. विशेष म्हणजे आमदाराच्या झाल्याच्या 90 व्या दिवशीच त्यांची हत्या करण्यात आली होती.
4 वेळा खासदार
प्रभुनाथ सिंह 1985 मध्ये पहिल्यांदा मशरख मतदारसंघातून अपक्ष आमदार म्हणून निवडून आले होते. 1990 मध्ये ते लालूप्रसाद यादव यांच्या पक्षाच्या वतीने आमदार झाले. 1998, 1999, 2004 आणि 2013 मध्ये महाराजगंज लोकसभा मतदारसंघात ते विजयी झाले होते. 1995 मध्ये आमदार अशोक सिंह यांच्या हत्येनंतर झालेल्या पोटनिवडणुकीत तारकेश्वर सिंह विजयी झाले होते.
अन्य गंभीर आरोप
प्रभुनाथ सिंह यांच्यावर निवडणूक प्रचारादरम्यान तत्कालीन जिल्हाधिकारी कुंदन कुमार यांना धमकी दिल्याचाही आरोप होता. याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदविला होता. प्रभुनाथ सिंह आणि सीवानचे माजी खासदार मोहम्मद शहाबुद्दीन यांच्यात शत्रुत्व होते. दोघांच्या समर्थकांमध्ये अनेकदा संघर्ष झाला होता. प्रभुनाथ सिंह हे काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचे टीकाकार होते. तर लालूप्रसाद यांचे प्रशंसक असलेले प्रभुनाथ सिंह यांचे नितीश कुमार यांच्याशी कधीच पटले नाही.









