पैसे, दागिन्यांच्या हव्यासातून निर्दयपणे खून
चिपळूण: तालुक्यातील धामणवणे- खोतवाडी येथील निवृत्त शिक्षिका वर्षा वासुदेव जोशी यांच्या खून प्रकरणाचे अवघ्या 48 तासात गूढ उकलण्यास पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात दोघांचा सहभाग असून त्यातील टॅव्हल एजंट जयेश भालचंद्र गोंधळेकर याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.
जोशी यांच्याकडील दागिने आणि पैसे याच्या हव्यासापोटी खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून पळवून नेलेले घरातील सीसीटीव्ही डिव्हीआर, संगणकातील हार्डडिस्क या एजंटकडून जप्त करण्यात आली असून चोरीचे दागिने तसेच काही रक्कम हस्तगत केली आहे. यशस्वी तपासाबद्दल जिल्हा पोलीस दलावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
शहरापासून जवळच असलेल्या धामणवणे-खोतवाडी येथील 63 वर्षीय प्राथमिक शाळेच्या निवृत्त शिक्षिका वर्षा वासुदेव जोशी यांचा हात-पाय बांधून निर्घृणपणे खून झाल्याची घटना गुरुवारी उघडकीस आल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली. दरम्यान गेली अनेक वर्षे घरात एकट्याच राहणाऱ्या वर्षा जोशी यांच्या खूनानंतर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अप्पर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी चिपळुणात धाव घेत तपासाच्या दृष्टीने पोलीस अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
शेजारील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेत नातेवाईकांची चौकशी करण्यात आली होती. तपासाची चक्रे वेगवान केल्यानंतर काही महत्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले. त्यातूनच मग या मारेकऱ्यापर्यंत पोहचण्यात पोलिसांना यश आले.
दरम्यान, आरोपीला अटक केल्यानंतर शनिवारी पोलीस अधीक्षक बगाटे यांनी येथील पोलीस ठाण्यात पत्रकार परिषद घेत या खून प्रकरणाची माहिती दिली.
या प्रकरणाच्या यशस्वी तपास केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या टीमला 25 हजार तर खून प्रकरणानंतर तपासासाठी तब्बल तीन दिवस येथे ठाण मांडून मार्गदर्शन करणाऱ्या अप्पर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या टीमला 10 हजाराचे बक्षीस पोलीस अधीक्षक बगाटे यांनी जाहीर केले आहे.








