गंभीर जखमी असलेल्या चौघांवर इस्पितळात उपचार
वृत्तसंस्था/ जुनागड, अहमदाबाद
ढगफुटीचा फटका बसलेल्या गुजरातमधील जुनागडमध्ये सोमवारी मुसळधार पावसामुळे दुमजली इमारत कोसळली. इमारत कोसळल्याची माहिती मिळताच प्रशासनाने तेथे बचावकार्य सुरू केले. या दुर्घटनेत सायंकाळपर्यंत दोन मृतदेह हाती लागले होते. तसेच अन्य चार जणांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दोन दिवसांपुर्वी गिरनार पर्वतावर कोसळलेल्या मुसळधार पावसाने जुनागडमध्ये आलेल्या महापुरात प्रचंड नुकसान झाले आहे. त्यातच आता शहरातील दातार रोडवरील काडियावाडजवळ इमारत दुर्घटना घडली. या घटनेत ढिगाऱ्याखाली सहा जण गाडले गेले. ही इमारत कोसळल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. इमारत कोसळल्यानंतर भर पावसातही ढिगारा हटविण्याचे काम सुरू होते. ढिगाऱ्यातून बाहेर काढलेल्या दोघांचा मृत्यू झाला तर चार जणांवर ऊग्णालयात उपचार सुरू आहेत.
दातार रोड हा जुनागडचा अतिशय दाट वस्तीचा परिसर आहे. ही इमारत अतिशय गजबजलेल्या ठिकाणी होती. इमारतीचा ढिगारा हटवण्यासाठी पोलीस आयुक्त, आयजी, डीजी यांच्यासह एनडीआरएफची टीम उपस्थित होती. याशिवाय अग्निशमन दल आणि पोलीस कर्मचारीही लोकांना बाहेर काढण्यात व्यस्त होते. प्राथमिक तपासात ही इमारत खूप जुनी असल्याचे समोर आले असून त्यामध्ये राहणाऱ्या लोकांना नोटिसाही देण्यात आल्या होत्या. दोन दिवसांपूर्वी जुनागडमध्ये अचानक पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. शहरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे जुनागढमधील परिस्थिती गंभीर झाली होती. लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी एसडीआरएफ, एनडीआरएफ आणि इतर एजन्सींसह पोलिसांची पथके सक्रीय होती. गेल्या तीन दिवसात हजारो लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.









