केंद्राने पाठविले तज्ञांचे पथक : राज्य सरकारकडून नियंत्रण कक्षाची स्थापना
वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम
केरळच्या कोझिकोड जिल्ह्यात निपाह विषाणूच्या संक्रमणाने दोन जणांचा जीव घेतला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी मंगळवारी दिली आहे. स्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि राज्य सरकारला मदत करण्यासठी तज्ञांचे पथक पाठविण्यात आल्याचे मांडविया यांनी सांगितले आहे.
केरळमध्ये निपाह विषाणूमुळे 30 ऑगस्ट रोजी पहिला बळी गेला होता. तर दुसरा बळी 11 सप्टेंबर रोजी गेला आहे. आरोग्य मंत्र्यांनी स्थानिक आरोग्य कर्मचाऱ्यांना स्वत:च्या कार्यक्षेत्रात कठोर देखरेख ठेवण्याचा निर्देश दिला आहे. तर केरळमधील 4 जणांचे नमुने निपाह विषाणूच्या संक्रमणाच्या तपासणीसाठी पुण्यातील नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ वायरोलॉजीमध्ये पाठविण्यात आले आहेत. राज्यात एक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून लोकांना मास्क वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
निपाह विषाणूमुळे दोन जणांचा मृत्यू झाल्यामुळे आरोग्य विभागाने कोझिकोडमध्ये अलर्ट जारी केला आहे. संबंधित रुग्णांच्या संपर्कात राहिलेल्या लोकांचा आता शोध घेतला जात आहे. आतापर्यंत राज्यात अधिकृतपणे निपाह फैलावल्याची घोषणा करण्यात आलेली नाही.
केरळच्या कोझिकोड आणि मलप्पुरम जिल्ह्यात 2018 मध्ये निपाह विषाणूमुळे 17 जणांचा मृत्यू झाला होता. तर 2019 मध्ये देखील कोचीमध्ये निपाह विषाणूचा एक रुण आढळून आला होता. 2021 मध्ये देखील निपाह संक्रमणाचा एक रुग्ण आढळला होता.
निपाह एक जूनोटिक विषाणू असून तो वटवाघळांद्वारे आणि डुकरांद्वारे माणसांमध्ये फैलावू शकतो. या विषाणूच्या संक्रमणात मृत्यूदर अत्यंत अधिक आहे. आतापर्यंत या संक्रमणावर कुठलीच उपचारपद्धत तसेच लस उपलब्ध नाही.
जागतिक आरोग्य संघटनेनुसार 1998 मध्ये मलेशियाच सुंगई गावात पहिल्यांदा निपाह विषाणूचा शोध लागला होता. तेव्हा डुकरांचे पालन करणारे शेतकरी या विषाणूने संक्रमित आढळले होते. मलेशियात पाळीव प्राण्यांमध्ये देखील याचे संक्रमण फैलावले होते.









