वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय बॉक्सिंग महासंघाचे अध्यक्ष अजय सिंग यांनी एका महत्त्वपूर्ण घडामोडीमध्ये आर्थिक गैरव्यवस्थापनाविषयीच्या स्वतंत्र चौकशीच्या पाठोपाठ महासचिव हेमंत कुमार कलिता आणि कोषाध्यक्ष दिग्विजय सिंग यांना निलंबित केले आहे. महासंघातील कथित आर्थिक अनियमिततेबाबत भारतीय क्रीडा प्राधिकरणाने केलेल्या तक्रारीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. उत्तर म्हणून महासंघाने या प्रकरणी स्वतंत्र चौकशी करण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश सुधीरकुमार जैन यांची नियुक्ती केली.
न्या. जैन यांच्या अहवालात कलिता आणि सिंग हे गंभीर आर्थिक अनियमितता आणि निधीच्या गैरव्यवस्थापनाबद्दल दोषी आढळले. तसेच त्यांनी त्यांच्यावरील जबाबदाऱ्यांचे स्पष्ट उल्लंघन केल्याचे दिसून आले. परिणामी त्यांना बीएफआयमधील संबंधित पदांवरून तत्काळ निलंबित करण्यात आले आहे.









