बेंगळूर : बेंगळूरच्या परप्पन अग्रहार कारागृहात फाशीची शिक्षा झालेला नराधम उमेश रेड्डी,लष्कर ए तोयबाशी संबंधित दहशतवादी आणि इतर कैद्यांना मोबाईल, टीव्ही व इतर सुविधा पुरविण्यात येत असल्याचे उघडकीस आल्याने खळबळ माजली आहे. या घटनेला जबाबदार ठरवत राज्य गृह खात्याने कारागृहाच्या मुख्य अधीक्षकांची तडकाफडकी बदली केली आहे. तर दोन अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे.
परप्पन अग्रहार कारागृहातील गैरप्रकारामुळे गृहमंत्री डॉ. जी.परमेश्वर यांनी सोमवारी बेंगळुरातील कारागृह विभागाच्या मुख्यालयात ‘राज्यातील कारागृहांमधील प्रशासन आणि सुरक्षा’ या विषयावर कारागृह व सुधारणा सेवा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, परप्पन अग्रहार कारागृहातील घटनेला तीन अधिकाऱ्यांना जबाबदार ठरविण्यात आले आहे. कारागृहाचे मुख्य अधीक्षक के. सुरेश यांची बदली केली आहे तर कारागृहाचे अधीक्षक मॅगेरी आणि साहाय्यक अधीक्षक अशोक भजंत्री यांना निलंबित करण्यात आले आहे.
अंशुकुमार कारागृहाचे नवे अधीक्षक
परप्पन अग्रहार कारागृहात कैद्यांची शाही बडदास्त आणि मौज-मस्तीचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सरकारने येथे मुख अधीक्षक म्हणून अंशुकुमार यांची नेमणूक केली आहे. सोमवारी यासंबंधीचे अधिकृत आदेशपत्रक जारी करण्यात आले आहे.









