68 लाख रु. खर्चून खरेदी, ‘जी-सुडा’मार्फत प्रशासकीय प्रक्रिया, कचरा वाहून नेण्यासाठी आता भाड्याच्या ट्रकांची गरज भासणार नाही
मडगाव : मडगाव पालिकेकडे चांगल्या क्षमतेचे ट्रक नसल्याने सोनसड्यावरील ओला कचरा साळगाव तसेच काकोडा येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पांत वाहून नेण्यासाठी भाडेपट्टीवर ट्रक घेण्याची पाळी आली होती. आता पालिकेच्या दिमतीला दोन नवेकोरे ट्रक उपलब्ध झाले असून दसऱ्यानंतर वाहतूक खात्याकडे नोंदणी करून ते लवकरच वापरात आणले जाणार असल्याची माहिती नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी दिली आहे. सदर ट्रक खरेदीवर पालिकेला 68 लाख ऊ. खर्च आला. ट्रक खरेदी करण्याची प्रशासकीय प्रक्रिया जी-सुडामार्फत करण्यात आली आहे. पालिकेने 64 लाख रुपयांचा जी-सुडाकडे भरणा केला होता. सदर प्राधिकरणाला पालिका आणखी 4 लाख रु. देणे बाकी आहे. त्याचा लवकरच भरणा केला जाणार असल्याची माहिती पालिकेच्या तांत्रिक विभागाच्या सूत्रांनी दिली. सदर दोन्ही ट्रक पालिकेच्या स्वाधीन करण्यात आले असून सोनसड्यावर ते ठेवण्यात आले आहेत.
पालिकेने 7 ऑगस्टपासून उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार साळगाव येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पात ओला कचरा वाहून नेण्यासाठी कोटेशनद्वारे तीन ट्रक भाडेपट्टीवर घेतले होते. निविदा न काढता ते घेण्यात आल्याने मध्यंतरी काही विरोधी गटातील नगरसेवकांनी सत्ताधारी गटावर टीका केली होती.पंधरवड्यापूर्वीपासून गोवा घनकचरा व्यवस्थापन महामंडळाने दोन ट्रक पुरविल्याने पालिकेकडून काकोडा प्रकल्पात या ट्रकांमधून प्रत्येकी 10 मिळून सुमारे 20 टन ओला कचरा पाठविण्यात येत आहे. त्याशिवाय अजूनही भाडेपट्टीवरील एक ट्रक भरून साळगाव येथे कचरा पाठविला जात आहे. पालिकेने आता नवे ट्रक घेतल्याने भाडेपट्टीवरील ट्रकांची गरज भासणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले. पालिकेने भाडेपट्टीवर ट्रक घेतल्याने त्यांच्यावर सुमारे 20 ते 22 लाख ऊ. इतका खर्च आतापर्यंत आला आहे. पालिकेने ट्रक खरेदीसाठी दोन महिन्यांपूर्वी पावले उचलली असती, तर सुमारे 20 लाख वाचले असते व एका ट्रकाची अर्धी किंमत भरून आली असती, अशी प्रतिक्रिया एका नगरसेवकाने व्यक्त केली.









