बेळगाव : परिवहनच्या ताफ्यात नवीन दोन बस दाखल झाल्या आहेत. त्यामुळे इतर बसवरील प्रवाशांचा ताण काहीसा कमी झाला आहे. मात्र अद्यापही परिवहनला नवीन बसेसची गरज आहे. दाखल झालेल्या बसेस शहरी मार्गावर धावत आहेत. बेळगाव परिवहनच्या ताफ्यात बसेसची कमतरता असल्याने सार्वजनिक बस वाहतूक त्रासदायक ठरत आहे. विविध मार्गांवर प्रवाशांची गैरसोय होत आहे. राज्य सरकारकडे गतवर्षीपासून नवीन 100 बसेसची मागणी होऊ लागली आहे. मात्र, आतापर्यंत केवळ 20 ते 25 बसेस दाखल झाल्या आहेत. त्यामुळे परिवहनची बस कमतरतेची समस्या कायम आहे.
गतवर्षीपासून शक्ती योजनेंतर्गत महिलांचा मोफत प्रवास सुरू आहे. विविध मार्गांवर प्रवाशांची संख्या दुपटीने वाढली आहे. त्यामुळे बस तुटवड्याचा प्रश्न आणखी गंभीर बनला आहे. परिणामी पुरुष आणि विद्यार्थ्यांना बसेस मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. प्रवाशांच्या तुलनेत बसेसची कमतरता असल्याने प्रवास अडचणीचा ठरत आहे. परिवहनने बसफेऱ्या वाढवाव्यात अशी मागणी होत होती. मात्र राज्य सरकारकडून केवळ दोन-चार बसेस देऊन परिवहनच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार सुरू आहे. त्यामुळे दैनंदिन परिवहनच्या बसचा प्रवास प्रवाशांना गैरसोयीचाच ठरू लागला आहे. गतवर्षीपासून परिवहनच्या ताफ्यात 20 ते 25 बसेस दाखल झाल्या आहेत. त्यामुळे अद्यापही 75 हून अधिक बसेसची कमतरता जाणवणार आहे.
आणखी पाच बसेस लवकरच
2024 मध्ये ऑगस्टदरम्यान नवीन तीन बसेस दाखल झाल्या होत्या. आता नवीन दोन बसेस दाखल झाल्या आहेत. टाटा कंपनीच्या बीएस-6 बसेस शहरासाठी सोडल्या जात आहेत. आणखी पाच बसेस लवकरच दाखल होणार आहेत, अशी माहितीही परिवहनने दिली.









