वृत्तसंस्था/ सेंट जोन्स
डिसेंबर महिन्यात विंडीज आणि इंग्लंड यांच्यात वनडे मालिका खेळविली जाणार आहे. या मालिकेसाठी विंडीज मंडळाने 15 जणांचा संघ जाहीर केला. या संघामध्ये दोन नवोदित अष्टपैलू शेरफेन रुदरफोर्ड आणि मॅथ्यू फोर्ड यांचा समावेश करण्यात आला आहे.
या संघामध्ये यष्टीरक्षक शेन डॉरिच याचे पुनरागमन झाले आहे. डॉरिचने यापूर्वी म्हणजे 2019 साली एकमेव वनडे सामना खेळला होता. 25 वर्षीय रुदरफोर्ड हा मध्य फळीतील उपयुक्त फलंदाज असून त्याने आतापर्यंत सहा टी-20 सामने खेळले आहेत. रुदरफोर्डने 2020 पासून अद्याप एकही सामना खेळलेला नाही. 21 वर्षीय मॅथ्यू फोर्ड हा वेगवान गोलंदाज आहे. इंग्लंड विरुद्ध ही वनडे मालिका डिसेंबर महिन्यात खेळवली जाणार असून या मालिकेसाठी विंडीजचे नेतृत्व शाय हॉपकडे सोपविण्यात आले आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेतील पहिला सामना 3 डिसेंबर, दुसरा सामना 6 डिसेंबर तर तिसरा आणि शेवटचा सामना 9 डिसेंबरला होणार आहे. पहिले दोन सामने अँटिग्वा तर शेवटचा सामना बार्बाडोस येथे खेळवला जाणार आहे. या मालिकेसाठी निकोलास पूरन आणि जेसन होल्डर उपलब्ध होऊ शतले नाहीत. ही वनडे मालिका झाल्यानंतर उभय संघात पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळविली जाणार आहे.
विंडीज संघ : शाय हॉप (कर्णधार), अॅलिक अॅथांझे, यानिक कॅरे, कार्टी, रॉस्टन चेस, डॉवरिच, मॅथ्यू फोर्ड, हेटमायर, ए. जोसेफ, ब्रेंडॉन किंग, मोती, ओटेली, रुदरफोर्ड, शेफर्ड आणि ओशेन थॉमस.









