लोणावळा / वार्ताहर :
आयपीएल मॅचवर सट्टा लावणाऱया मुंबईतील दोन बुकींना पुणे पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून दीड लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. लोणावळा परीसरातील तुंगार्ली गावच्या हद्दीत बंगला भाडेतत्वावर घेऊन त्यामध्ये हा सट्टाबाजार सुरू होता.
राजवीनसिंग मनजितसिंग बांगा (वय 28) आणि मस्कीनसिंग रजेंद्रसिंग अरोरा (वय 30, दोघेही रा. अॅन्टॉप हिल, मुंबई) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपांकडून राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनऊ सुपर जाएंट संघादरम्यान खेळावर सट्टा लागणार असल्याची बातमी स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना मिळाली. मुंबईतील दोन सट्टेबाजांनी लोणावळा परिसरात तुंगार्ली गावच्या हद्दीत भाडेतत्वावर बंगला घेतल्याचे उघडकीस आले. पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने निसर्ग बंगलो सोसायटीतील बंगला क्रमांक तीनवर छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 7 मोबाईल, लॅपटॉप साहित्यासह एकूण दीड लाख रूपयांचा ऐवज जप्त केला. लोणावळा पोलीस यासंदर्भात अधिक तपास करत आहेत.









