हत्या प्रकरणात दोषी : परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
वृत्तसंस्था/अबू धाबी, नवी दिल्ली
संयुक्त अरब अमिरातीमध्ये (युएई) आणखी दोन भारतीय नागरिकांना फाशी ठोठावण्यात आली आहे. दोघांनाही हत्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. दोघेही मूळचे केरळचे रहिवासी असून मोहम्मद रिनाश अरंगिलोट्टू आणि मुरलीधरन पेरुमथट्टा वलाप्पिल अशी त्यांची नावे आहेत. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने फाशीची पुष्टी केली आहे. 28 फेब्रुवारी 2025 रोजी युएईच्या अधिकाऱ्यांनी भारतीय दूतावासाला यासंबंधी माहिती दिली आहे. मात्र, फाशी कोणत्या तारखेला देण्यात आली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. यापूर्वी उत्तर प्रदेशातील एका महिलेला फाशी दिल्याची बाब गेल्या आठवड्यात उघड झाली होती.
फाशी ठोठावण्यात आलेला रिनाश हा एका ट्रॅव्हल एजन्सीमध्ये काम करत होता. त्याने युएईच्या एका नागरिकाची हत्या केली होती. तर मुरलीधरनला एका भारतीय माणसाच्या हत्येप्रकरणी मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. भारतीय दूतावासाने दया याचिका आणि माफीसाठी अपील केले होते, परंतु यूएई सर्वोच्च न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा कायम ठेवली. मृतांच्या कुटुंबीयांना फाशीची माहिती देण्यात आली असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. दोघांनाही शक्य ती सर्व कायदेशीर मदत पुरवली आहे. दोघांच्याही कुटुंबातील सदस्यांना अंत्यसंस्कारात उपस्थित राहण्याची व्यवस्था करण्याचा मंत्रालय प्रयत्न करत असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
परदेशात मृत्युदंडाची शिक्षा झालेल्या भारतीयांची संख्या युएईमध्ये सर्वाधिक आहे. तेथे 29 भारतीयांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आल्याची माहिती परराष्ट्र राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी 13 फेब्रुवारी रोजी राज्यसभेत दिली होती. तथापि, उत्तर प्रदेशातील बांदा येथील रहिवासी 33 वर्षीय शहजादी खान आणि केरळमधील दोन तरुणांना शिक्षा ठोठावल्यानंतर ही संख्या 26 वर आली आहे. 15 फेब्रुवारी रोजी युएईमध्ये शहजादी खानला फाशी देण्यात आली. शहजादी हिच्यावर 4 महिन्यांच्या मुलाची हत्या केल्याचा आरोप होता. ती 2 वर्षे दुबई तुरुंगात होती. चार महिन्यांपूर्वी न्यायालयाने तिला मृत्युदंडाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये तिला फाशीवर लटकवण्यात आले. तर 5 मार्च रोजी युएईमध्येच अंत्यसंस्कार करण्यात आले.









