एकटा दिकरपालचा तर दुसरा रावणफोंडचा
मडगाव : मॉर्निंग वॉकसाठी जाताना मृत्यू येण्याची उत्तर गोव्यातील एका पोलीस उपनिरीक्षकासंबंधीची घटना ताजी असतानाच अशाच प्रकारच्या दोन घटना दक्षिण गोव्यात घडल्या आहेत. मायणा-कुडतरी पोलीस स्थानकाच्या हद्दीतील दिकरपाल येथील घटनेत 49 वर्षीय मार्सेल वालीस हे मॉर्निंग वॉकला गेले असता परत येताना घराजवळच कोसळले. त्यांना तातडीने मडगावच्या जिल्हा इस्पितळात नेण्यात आले. तेथून बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात नेण्यात आले. तेथे उपचार चालू असताना त्यांचा मृत्यू झाला. अशाच प्रकारची दुसरी घटना मडगावात घडली. 31 वर्षीय रतन दास हा मूळ आसामचा. मात्र दक्षिण गोव्यात तो नोकरी करत होता. सोमवारी सकाळची ही घटना. हा युवक मडगावहून रावणफोंड येथील इएसआय इस्पितळाच्या दिशेने चालत येत होता. लगेच त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्याला वेदना होत होत्या म्हणून रस्त्याच्या बाजूला पार्क करुन ठेवलेल्या रिक्षामध्ये तो विश्रांती घेण्यासाठी बसला. काही वेळाने फुटपाथवरुन पायी जाऊ लागला. काही पावले जातो न जातो तोच तो खाली कोसळला. त्याला मडगावच्या जिल्हा इस्पितळात नेल्यानंतर तेथे ड्युटीवर असलेल्या डॉक्टरांनी ‘मृतावस्थेत आणले’ अशी नोंद केली.