भारताच्या भूभागावर केला होता दावा : फिलिपाईन्स अन् मलेशियाने नोंदविला आक्षेप : दक्षिण चीन समुद्राचा मुद्दा
वृत्तसंस्था /क्वालांलपूर, मनीला
चीनच्या कथित ‘स्टँडर्ड मॅप’वर भारताप्रमाणेच फिलिपाईन्स आणि मलेशियाने देखील मोठा आक्षेप दर्शविला आहे. चीनने स्वत:च्या नकाशात भारताचे राज्य अरुणाचल प्रदेश आणि अक्साई चीन क्षेत्राला चीनच्या हिस्स्याच्या स्वरुपात दाखविले असून यावर भारताने अत्यंत तीव्र प्रतिक्रिया नोंदविली आहे. तर चीनच्या नव्या नकाशाला आम्ही नाकारत असून यात अनेक देशांच्या हिस्स्यांना चिनी क्षेत्र संबोधित करण्यात आल्याचे फिलिपाईन्सने म्हटले आहे. फिलिपाईन्सला साथ देत मलेशियाने देखील चीनचा नवा नकाशा फेटाळला आहे. चीनने मलेशियाच्या सागरी क्षेत्रावर स्वत:चा दावा सांगितला आहे. नवा नकाशा चीनच्या आक्रमकतेचे एक रुप आहे. नव्या नकाशात दक्षिण चीन समुद्राच्या मलेशियाच्या किनाऱ्यावर चीनने स्वत:चा दावा सांगितला असल्याचे मलेशियाने एका वक्तव्याद्वारे म्हटले आहे. मलेशियाच्या विदेश मंत्रालयाने चीनच्या दाव्यांना फेटाळून लावत आमचा देश या नकाशाला मान्यता देत नसल्याचे स्पष्ट केले आहे. दक्षिण चीन समुद्राचा मुद्दा ‘जटिल आणि संवेदनशील’ असल्याचे म्हणत मलेशियाने अशाप्रकारच्या वादांना चर्चेच्या माध्यमातून शांततापूर्ण आणि तर्कसंगत पद्धतीने सोडविण्याची गरज असल्याची भूमिका मांडली आहे. चीन जवळपास पूर्ण दक्षिण चीन समुद्रावर स्वत:चा दावा सांगत आहे. दक्षिण चीन समुद्र व्यापाराच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, कारण याच्याद्वारे दरवर्षी अब्जावधी डॉलर्सचा व्यापार होत असतो. दक्षिण चीन समुद्रावरील चीनच्या अधिकाराच्या दाव्याला कुठलाही कायदेशीर आधार नसल्याचे आंतरराष्ट्रीय न्यायालयाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे, तरीही चीन स्वत:चा दावा सोडून देण्यास तयार नाही.
दक्षिण चीन समुद्राच्या काही हिस्स्यांवर मलेशिया, फिलिपाईन्स, व्हिएतनाम आणि ब्रुनेई देखील दावा करतात. तर अमेरिका देखील आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रातील संचारस्वातंत्र्य कायम राखण्यासाठी दक्षिण चीन समुद्राच्या माध्यमातून स्वत:च्या नौदलाच्या युद्धनौकांना या भागात पाठवत आहे. चीनने 28 ऑगस्ट रोजी स्वत:चा ‘स्टँडर्ड मॅप’ जारी केला होता, ज्यात त्याने दक्षिण चीन समुद्रातील एकतर्फी दावे असलेल्या सर्व क्षेत्रांना स्वत:च्या अधिकारक्षेत्रात दाखविले आहे. दक्षिण चीन समुद्रातील चीनच्या दाव्यांना मलेशिया मान्यता देणार नाही, चीनने स्वत:च्या नव्या नकाशात मलेशियाच्या सागरी क्षेत्राला दाखविले असल्याचे म्हणत मलेशियाच्या विदेश मंत्रालयाने संताप व्यक्त केला आहे. 2021 मध्ये चीनचे जहाज दक्षिण चीन समुद्रात मलेशियाच्या विशेष आर्थिक क्षेत्रात दाखल झाल्यावर मलेशियाने चिनी राजदूताला पाचारण करत स्पष्टीकरण मागितले होते. दक्षिण चीन समुद्रातील बोर्नियो बेटावर मलेशिया स्वत:चा दावा करत आहे. अलिकडच्या वर्षांमध्ये चीन दक्षिण चीन समुद्रात कृत्रिम बेटांची निर्मिती करत आहे. चीन तेथे सैन्यसुविधा आणि विमानांसाठी धावपट्ट्या निर्माण करत आहे.
चीनच्या नकाशावर भारताचा आक्षेप
चीनने स्वत:च्या स्टँडर्ड मॅपमध्ये अरुणाचल प्रदेश आणि अक्साई चीनला स्वत:चा हिस्सा दर्शविले आहे. भारताने या नकाशावरून चीनसमोर राजनयिक स्तरावर विरोध नोंदविला आहे. चीनच्या दाव्यांना कुठलाच आधार नसल्याने ते आम्ही फेटाळत आहोत. चीनचे अशाप्रकारचे पाऊल सीमा वादावर तोडगा काढण्याची प्रक्रिया अधिक जटिल करत असल्याचे विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी म्हटले होते.
फिलिपाईन्सही संतप्त
स्टँडर्ड मॅपमध्ये चीनने 10 डॅश लाइनला सामील केले आहे. फिलिपाईन्स समुद्रातील फिलिपाईन्सच्या विशेष आर्थिक क्षेत्राला चीनचा हिस्सा म्हणून नकाशात दर्शविण्यात आले आहे. यावर फिलिपाईन्सने तीव्र आक्षेप नोंदविला आहे. फिलिपाईन्सच्या फॅसिलिटी सेंटर आणि सागरी क्षेत्रांवर चीनच्या दाव्यांना आंतरराष्ट्रीय कायदा, विशेष स्वरुपात समुद्रविषयक कायदा 1982 अंतर्गत कुठलाच आधार नसल्याचे फिलिपाईन्सच्या विदेश मंत्रालयाने गुरुवारी म्हटले आहे. चीनने अधिक जबाबदारीपूर्वक काम करावे आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांचे तसेच करारांचे पालन करावे असे फिलिपाईन्सने सुनावले आहे.









