पश्चिम बंगाल-दुर्गापूर सामूहिक बलात्कार प्रकरण : ममता बॅनर्जी यांचे कडक कारवाईचे आश्वासन
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालमधील दुर्गापूर येथे ओडिशातील एका वैद्यकीय विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात पोलिसांनी आणखी दोन आरोपींना सोमवारी अटक केली आहे. आतापर्यंत या प्रकरणात एकूण पाच जणांना अटक करण्यात आली आहे. राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कठोर कारवाईचे आश्वासन दिले असून तपास यंत्रणांकडून कसून चौकशी सुरू आहे. परंतु मुख्यमंत्र्यांच्या विधानामुळे विरोधी पक्ष आणि महिला संघटनांमध्ये संताप निर्माण झाला. मुख्यमंत्र्यांनी महिलांना रात्री उशिरा एकटे बाहेर न जाण्याचे आवाहन केले होते. या निर्णयावर विरोधी पक्ष आणि महिला हक्क गटांकडून तीव्र टीका झाली.
ओडिशाच्या बालासोर जिह्यातील जलेश्वर येथील 23 वर्षीय विद्यार्थिनीवर शुक्रवारी रात्री एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयाबाहेर मित्रासोबत जेवण्यासाठी बाहेर गेली असताना सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. या प्रकरणात विद्यार्थिनीच्या तक्रारीनंतर जबानीत दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आल्याचे आसनसोल-दुर्गापूर पोलीस आयुक्तालयाचे उपायुक्त अभिषेक गुप्ता यांनी सांगितले. सुरुवातीला रविवारी विद्यार्थिनीच्या सामूहिक बलात्कारात सहभागी असल्याबद्दल तीन जणांना अटक करण्यात आली होती. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ही घटना धक्कादायक असल्याचे वर्णन करतानाच सरकारचे अशा गुह्यांबद्दल ‘शून्य सहनशीलता’ धोरण असल्याचा दावा केला होता.
………….









