कोल्हापूर :
सोशल मिडीयावर झालेल्या ओळखीतून आंतरजातीय विवाह केलेल्या जावयाचे सासऱ्याने साथीदारांच्या मदतीने अपहरण केले होते. या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सासऱ्यासह तिघांना अटक केली होती. शनिवारी या प्रकरणी वैभव रामचंद्र घाडगे (वय 27 रा. शाहूनगर मिणचे ता. हातकणंगले, सध्या रा. मिरज) , संग्राम सतिश धुमाळ (वय 27 रा. पाण्याच्या टाकीजवळ सांगली नाका इचलकरंजी) या दोघांना अटक केली.
निगवे दुमाला येथील विशाल आडसूळ याची श्रुती कोकरे हिच्याशी सोशल मिडीयावर ओळख झाली. यातून या दोघांनी लग्न केले. यास श्रुती कोकरे हिचे वडील श्रीकृष्ण कोकरे यांचा विरोध होता. यातून श्रीकृष्ण कोकरे याने 8 फेब्रुवारी रोजी विशाल आडसूळ याचे साथीदारांकरवी अपहरण करुन मिरज येथील एका खोलीत डांबून ठेवले होते. त्याला मारहाण करुन त्याचे हातपाय बांधण्यात आले होते. याचा छडा स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने 48 तासांमध्ये लावत अपह्त विशाल आडसूळ याची सुखरुप सुटका केली होती. या प्रकरणी सासरा श्रीकृष्ण महादेव कोकरे (वय 45), धीरज उर्फ हणमंत नामदेव पाटील (वय 56), राजेंद्र परमेश्वर कट्टीमनी (वय 33) या तीघांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून चौकशीत आणखीन नावे निष्पण्ण झाली. शनिवारी इचलकरंजी येथून वैभव घाडगे, संग्राम धुमाळ या दोघांना अटक केली. या दोघांनीची विशालचे चाकूचा धाक दाखवून अपहरण केले होते.








