अथणी तालुक्यातील भरमकोडी येथील घटनेने हळहळ
बेळगाव : लसीकरणानंतर दोन महिन्यांच्या बालकाचा मृत्यू झाला आहे. अथणी तालुक्यातील भरमकोडी येथे ही घटना घडली असून अथणी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात या बालकावर उत्तरीय तपासणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर त्याचा मृतदेह अथणीला नेण्यात आले. आण्णाप्पा दुंडाप्पा बेवनूर (वय दोन महिने) असे दुर्दैवी बालकाचे नाव आहे. 28 फेब्रुवारी रोजी त्याचा जन्म झाला होता. गुरुवार दि. 17 एप्रिल रोजी भरमकोडी गावात लसीकरणाचा कार्यक्रम सुरू होता. याची माहिती मिळाल्यानंतर आण्णाप्पाचे वडील दुंडाप्पा व आई कस्तुरी यांनी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास या बालकाला गावातील विठ्ठल मंदिरात नेले.
तोंडात दोन थेंब पोलिओ लस दिल्यानंतर आण्णाप्पाच्या हातापायांना आरोग्य कर्मचाऱ्यांनी तीन इंजेक्शन दिली. एका इंजेक्शननंतर या बालकाला रक्तस्राव सुरू झाला. लवकर रक्त थांबले नाही. शेवटी त्याला अथणी येथील खासगी इस्पितळात नेण्यात आले. डॉक्टरांनी या बालकाला मृत घोषित केले. लसीकरणानंतर बालकाचा मृत्यू झाल्यामुळे पालकांना धक्का बसला आहे. यासंबंधी अथणी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी सायंकाळी सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात बालकाच्या मृतदेहावर उत्तरीय तपासणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यावेळी बालकाचे वडील दुंडाप्पा, त्याची आत्या व इतर कुटुंबीय शवागाराबाहेर होते. त्यांचा एकच आक्रोश सुरू होता.
शवचिकित्सा अहवालानंतरच निश्चित कारण समजू शकणार
दोन महिन्यांच्या बालकाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? याचा उलगडा शवचिकित्सा अहवाल उपलब्ध झाल्यानंतर होणार आहे. वडील दुंडाप्पा यांनी दिलेल्या माहितीनुसार जन्मत:च या बालकाला हृदयरोग जडला होता. त्यामुळे ही घटना घडली आहे का? असा संशयही व्यक्त करण्यात येत आहे. शवचिकित्सा अहवाल उपलब्ध झाल्यानंतरच मृत्यूचे निश्चित कारण समजू शकणार आहे.









