नगरविकास खात्याचा आदेश : मिळकतधारकांना 30 जूनपर्यंत सवलतीचा होणार लाभ
बेळगाव : पाच टक्के सवलत दिल्यास घरपट्टी भरणाऱ्यांची संख्या वाढण्यासह घरपट्टी वसुलीही वाढेल, अशा अपेक्षेने नगरविकास खात्याच्यावतीने घरपट्टीवरील पाच टक्के सवलतीला मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे मिळकतधारकांना आता 30 जूनपर्यंत दोन महिने या सवलतीचा लाभ मिळणार आहे. दरवर्षी आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यात म्हणजे एप्रिलमध्ये जे मिळकतधारक घरपट्टी भरतात त्यांना घरपट्टीवरील पाच टक्के सवलत दिली जाते. त्यानुसार यावर्षीही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 1 ते 30 एप्रिलपर्यंत घरपट्टी भरलेल्यांना सवलत देण्यात आली. मात्र, 1 मे पासून घरपट्टीवरील सवलत बंद झाली होती. त्यामुळे घरपट्टीवरील पाच टक्के सवलतीला मुदतवाढ दिली जावी, असा प्रस्ताव नगर प्रशासन खात्याकडून नगरविकास खात्याकडे पाठविला होता. या प्रस्तावाला नगरविकास खात्याने मंजुरी दिली आहे.
त्यानुसार 30 जूनपर्यंत सवलतीला मुदतवाढ मिळाली आहे. शुक्रवार दि. 9 रोजी शासनाने हा आदेश जारी केला आहे. मात्र, 1 ते 9 मे या काळात ज्या मिळकतधारकांनी घरपट्टी भरली आहे, त्यांचे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण या काळात ज्यांनी घरपट्टी भरली आहे, त्यांना पाच टक्के सवलतीचा लाभ मिळालेला नाही. त्यांना पुढील आर्थिक वर्षात सवलत दिली जाऊ शकते. राज्य शासनाने प्रथम बेंगळूर महापालिकेत या सवलतीला मुदतवाढ दिली होती. पण बेळगावसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांना मुदतवाढ मिळाली नव्हती. त्यामुळे सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना हा आदेश लागू करावा, अशी मागणी होत होती. तसे पत्रही बेळगाव मनपातर्फे नगरप्रशासनाला पाठविण्यात आले होते. याची दखल घेत नगरप्रशासन खात्याने नगरविकास खात्याला प्रस्ताव पाठविला. त्यानुसार अखेर घरपट्टीवरील पाच टक्के सवलतीला दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे.
सवलतीमुळे घरपट्टी वसुलीत वाढ होण्याची शक्यता
पाच टक्के सवलत दिल्यास घरपट्टी भरणाऱ्यांची संख्या वाढेल. त्याचबरोबर घरपट्टी वसुलीदेखील वाढेल, अशी अपेक्षा नगरविकास खात्याच्यावतीने व्यक्त करण्यात आली आहे. बेळगाव महापालिकेत चालू आर्थिक वर्षातील एप्रिल महिन्यात तब्बल 30 कोटी घरपट्टी मिळकतधारकांनी भरली आहे. त्यामुळे आणखी दोन महिने सवलत देण्यात आली असल्याने घरपट्टी वसुली वाढण्याची शक्यता आहे.









