रात्री उशिरा शिरोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
शिरोळ : येथील शिरोळ ते कनवाड मार्गावरील महात्मे यांच्या नव्याने बांधकाम करीत असलेल्या घराजवळ दोन अल्पवयीन मुलांनी वीटभट्टी कामगाराचा धारदार शस्त्राने डोक्यावर, छातीवर, व डाव्या हातावर वर्मी घाव घालून खून केला. राजू दिलीप कोलप (वय 40 रा. मिरज) असे मृताचे नाव आहे. या घटनेनंतर संशयित पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
याबाबत घटनास्थळावरून व पोलिसातून मिळालेली माहिती अशी की गोरखनाथ माने यांच्या वीट भट्टीवर मयत राजू घोलप व अन्य दोन मुले कामाला होती. वीट भट्टी बंद झाल्याने ते रविवारी रात्री मोटरसायकलवरून निघाले होते. सोमवारी पाच वाजण्याच्या सुमारास शिरोळ कनवाड रोडवरील महात्मे यांच्या घराचे बांधकाम करीत असलेल्या फाउंडेशनवर वीट भट्टी कामगार राजू कोलप याचा खून झाल्याचे समजताच याठिकाणी शिरोळ पोलीस दाखल झाले.
कनवाड ते शिरोळ रस्त्याच्या दरम्यान असलेल्या वीट भट्टीवर पोलिसांनी चौकशी सुरू केली. खून झालेल्या ठिकाणी दारूचे पाकीट, स्नॅकचे पाकीट आढळून आले असून पोलिसांनी ते जप्त केले आहेत. सदरचा खून हा दोन अल्पवयीन तरुणांनी केला असल्याची चर्चा उपस्थित सुरू होती. त्या दृष्टीने शिरोळ पोलीस तपास करीत आहेत.
खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. रात्री उशिरा शिरोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. घटनास्थळी उपअधीक्षक रोहिणी सोळंके यांनी भेट देऊन पोलिसांना पुढील तपासाच्या सूचना दिल्या. निरीक्षक शिवाजीराव गायकवाड, यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदीप जाधव, वाय. पी. खरात तपास करीत आहेत








