ऑनलाईन टीम / तरुण भारत :
Two Lashkar-e-Toiba suspects released on bail लष्कर-ए-तोयबा’ या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचा संशयावरून पुणे एटीएसने अटक केलेल्या दोन संशयितांची पुणे सत्र न्यायालयाने जामिनावर सुटका केली.
आफताब हुसेन अब्दुल जब्बार शाह आणि मोहम्मद युसूफ अत्तू यांना मे आणि जून महिन्यात पुणे एटीएसने अटक केली होती. ते दोघेही जम्मू-काश्मीरचे रहिवाशी होते. त्यांच्यावर भादंवि 124(अ) आणि 153 बी या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. सरकारविरोधी कारवाईचा कट रचल्याचा त्यांच्यावर आरोप होता. मात्र, पुराव्यांअभावी त्यांना जामीन देण्यात आला.
पुणे एटीएसने मोहम्मद जुनैदला मे महिन्यात पुण्यातून ताब्यात घेण्यात आले होते. तो मूळचा बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील राहणारा आहे. पुण्यात तो भंगाराचा व्यवसाय करत होता. त्याशिवाय, एटीएसने उत्तर प्रदेशातील इनामूल हक यालादेखील अटक केली होती. अटक करण्यात आलेल्या आफताब आणि मोहम्मद या दोन संशयितांचे जुनैदसोबत संबंध असल्याचे दिसून आले. जुनैदने आफताबशी संपर्क साधला आणि त्यांच्या संभाषणात फरार आरोपी उमरचा उल्लेख आहे. मात्र, आफताब दहशतवादी कारवायांमध्ये किंवा दहशतवादी संघटनेत सामिल होता का, याचा अंदाज या संभाषणावरून लावता येत नाही.
तसेच युसूफने जुनैदच्या खात्यावर 10 हजार रुपये जमा केले. मात्र, त्यांच्यात कोणतंही संभाषण झालं नाही. त्यामुळे युसूफने अन्य कोणाच्या तरी सांगण्यावरून पैसे पाठवल असावेत. त्याचा दहशतवादी कारवायांमध्ये थेट संबंध असल्याचे पुरावे नाहीत, असे कोर्टाने म्हटले आहे.









